सावधान येथे दिले जातय मृत्यूला आमंत्रण

Chalisgav-to-Dhule-Road
Chalisgav-to-Dhule-Road

खड्ड्यांमुळे बसेसही होताहेत बंद, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - येथील चाळीसगाव ते धुळे रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची अक्षरशः वाट लागत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसही आता बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात दखलच घेतली जात नसल्याने परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चाळीसगाव- धुळे महामार्गावर हजारो खड्डे पडले आहेत. गिरणा नदीच्या पुलावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. काल (२७ सप्टेंबर) औरंगाबाद येथून कुबेर येथे जाण्यासाठी निघालेले उद्धवराव जाधव (रा. वारेगाव, जि. औरंगाबाद) हे आपल्या अल्टो गाडीने (क्रमांक- एम. एच. २०, डीजी ५८०३) जात होते. रात्री बाराच्या सुमारास त्यांची गाडी गिरणा नदीच्या पुलावरील खड्ड्यात आदळली. ज्यात गाडीचा पाटा तुटून काचाही फुटल्याने गाडी जागेवरच बंद पडली. ज्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. श्री. जाधव यांची मुलगी धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे दिलेली असल्याने त्यांना तेथे मुक्काम करावा लागला. आज सकाळी ते धुळे येथे गाडी टोचून करुन घेऊन गेले. त्यांनी या भागातील लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

तीन दिवसांपूर्वी झाला अपघात
या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे वाहनधारकासाठी जिकरीचे जात आहे. काल (२७ सप्टेंबर) दुपारी सोलापूरकडे जाणाऱ्या व कुरिअर वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने खड्ड्यांमुळे दुचाकी चालकास वाचवण्याच्या प्रयत्न केला असता, हा ट्रक रस्त्याच्या कडेला उतरून लिंबाच्या झाडाला धडकला. त्यात चालक गंभीर जखमी झाला होता. तसेच मेहुणबारे जवळच्या गिरणा पुलानजीक वर्षा हॉटेलजवळ समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक (क्रमांक- टी. एस. ०५ एयु ६९४६) रस्त्याच्या कडेला उतरून लिंबाच्या झाडाला धडकला. त्यात महंमद रईस हा चालक जखमी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर घडली होती. काही ठिकाणी अत्यंत खोल खड्डे झाल्याने ते टाळण्याच्या नादात वाहनांचे अपघात होत आहेत. महामार्ग प्राधिकरण विभाग अजूनही मुग गिळून असल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गिरणा पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत
येथील गिरणा पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या आहेत. पूल सध्या वापरण्यायोग्य देखील राहिलेला नसल्याने या पुलावरून चालताना भीती निर्माण होते. गिरणा नदीवर हा पूल १९७० मध्ये बांधण्यात आला आहे. या पुलाला ४७ वर्षे झाली असून त्याच्या उघड्या अँगलची मध्यंतरी थातूरमातूर डागडुजी केली होती. पुलावर उभे राहिल्यानंतर हा पुल अक्षरशः हलतो. सद्यःस्थितीत किमान दोन्ही बाजूच्या कठड्यांचे भक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे. दररोज बाराशेच्यावर वाहनांची या रस्त्यावरून ये- जा असते. औरंगाबदारकडून धुळे, सुरत किंवा इंदोरकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे या पुलाची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे. या पुलाची वैधता शंभर वर्षांची असली तरी सध्या धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या निवडणूक काळात हेच का ‘अच्छे दिन’? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेकांना जडले मणक्यांचे विकार
चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना कुठून चालवावे, असा प्रश्‍न चालकांना पडलेला असतो. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे मोजता येणार नाहीत, असे अगणित खड्डे या रस्त्यावर पडल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनधारकांना अक्षरशः कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या खराबीमुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. बऱ्याच दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या संदर्भात खासदार उन्मेष पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सद्यःस्थितीत किमान खड्डे तरी बुजावेत, अशी आर्त मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com