आदर्श गाव साकारण्यासाठी झटून सारे लागले कामाला...!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

इगतपुरी : इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाणा तालुक्‍यांतील आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावून आदर्श गाव संकल्पना साकार करण्यासाठी स्वदेश फाउंडेशनने या तालुक्‍यांतील गावे दत्तक घेतली असून, तेथे विकासकामे केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन इगतपुरीतील काही गावांची पाहणी करून तेथे करावायाच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. 
 
 रायगड जिल्ह्यात स्वदेश फाउंडेशन वीस वर्षांपासून गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करत आहे. फाउंडेशनने या वर्षी एक हजार गावे आदर्श करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील या चार तालुक्‍यांतील काही गावे निवडली आहेत. त्यासाठी प्रथम या तालुक्‍यांतील कुठल्या गावांमध्ये कुठल्या आदर्श योजना सुरू आहेत, कुठल्याही इतर योजना सुरू असल्यास त्यांचा उपयोग, त्या योग्य की अयोग्य, अशी सर्वच तपासणी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. 

या सुविधांमध्ये प्राथमिक शाळा, पीएचसी सेंटर, आरोग्य केंद्र, पाणी वितरणाची व्यवस्था, शौचालयांची स्थिती एकूणच सर्वच बाबींची पाहणी करण्यात आली. फाउंडेशनच्या मदतीने सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच कृषी विभागातर्फे देण्यात आली. त्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरीकरण केले. त्यानंतर इगतपुरीतील गावांची पाहणी करून आणि इगतपुरी पंचायत समिती येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. इगतपुरीतील मुंढेगावचे सेंट्रल किचन, काळुस्ते येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळा, पिंपळगाव मोर येथील अंगणवाडी व ग्रामस्थांशी चर्चा केली. चिंचलेखैरे गावालाही भेट देत पाहणी केली. 

 जिल्ह्यातील आदिवासी भागातील काही गावांच्या विकासासाठी स्वदेश फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून गावांतील सुधारणांना वेग येईल. शिवाय आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. 
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा