चोवीस तास पाण्यासाठी आयुक्तांकडून चाचपणी

नाशिक - जलशुद्धीकरण केंद्राची मंगळवारी पाहणी करताना महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे.
नाशिक - जलशुद्धीकरण केंद्राची मंगळवारी पाहणी करताना महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे.

नाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत शहरासह गावठाण भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यादृष्टीने पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रांची महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (ता. ८) पाहणी केली. पाणीपुरवठ्याची प्रक्रिया समजून घेऊन त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरत विविध सूचना केल्या. 

महापालिका आयुक्‍त मुंढे यांनी सकाळी नऊला बारा बंगला परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. केंद्राभोवतालच्या परिसरातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्‍त करताना, सायंकाळपर्यंत स्वच्छता न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

स्मार्टसिटीअंतर्गत शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचा महापालिकाचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्केडा यंत्रणा बसविण्यात येत आहे. 

या यंत्रणेमुळे पाणी उपशापासून तर ग्राहकांना मिळेपर्यंतच्या प्रक्रियेत कुठे गळती होते, याचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे श्री. मुंढे यांनी सांगितले. केंद्रावर आढळलेल्या जुनाट मशिन लिलावात काढाव्यात यासह अन्य सूचना आयुक्‍तांनी केल्या. 

खडी तपासण्याचे आदेश
तिडके कॉलनीत सुरू असलेल्या जलकुंभाच्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली असता, तेथील काँक्रिटमध्ये वापरलेली खडी व वाळूच्या तपासणीदरम्यान संबंधितांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे तेथील खडी नाकारत तातडीने उचलून घ्यावी, तसेच निविदेत नमूद केल्याप्रमाणे खडीच काँक्रिटसाठी वापरावी. वापरापूर्वी लॅबमध्ये व साइटवरही तपासणी करावी, असे आदेश आयुक्‍तांनी दिले. निलगिरी बाग परिसरातही समाधानकारक काम नसल्याने १० टक्‍के दंड बजावला.

तंबाखूची पुडी आढळल्याने वेतनवाढ रद्द
जलशुद्धीकरण केंद्रातील कार्यालय व प्रयोगशाळेची पाहणीही आयुक्‍तांनी केली. कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये तंबाखूची पुडी सापडली. त्यावर कनिष्ठ अभियंत्यास आयुक्‍तांनी धारेवर धरले. संबंधित अभियंत्याची एक वेतनवाढ रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले.

१० टक्‍के दंड अन्‌ तंबीही
टाकळी रोडवरील गोडेबाबानगर येथे जलकुंभाच्या भेटीदरम्यान आयुक्‍तांनी वर्कऑर्डर तपासली असता, कामाची मुदत संपूनही काम संपलेले नसल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरताना आयुक्‍तांनी निविदा अटीनुसार १० टक्‍के दंड बजावला. परिसरात नागरिकांनी कचरा टाकल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणीही त्यांनी कारवाईचे आदेश दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com