नाशिक - आडगावकर ज्वेलर्सचे 28 लाख रूपये लुटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नाशिक : गंगापूर रोडवरील सारस्वत बॅंकेमध्ये कॅनडा कॉर्नरवरील आडगावकर ज्वेलर्सची भरण्याची 28 लाखांची रोकड कर्मचाऱ्यांना पैसे पडल्याचा बहाणा करून संशयितांनी लुटून नेल्याचा प्रकार भरदिवसा घडला. सदरचा प्रकार बॅंकेच्या आतमध्ये घडला असून तिघे संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत संशयितांची ओळख पटविण्याची काम सुरू आहे. पोलीस आयुक्तांसह गुन्हेशाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत तपास सुरू केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नरवरील आडगावकर ज्वेलर्सचे चार कर्मचारी दुकानाच्या भरण्याची 28 लाख 64 हजार 268 रुपयांची रोकड घेऊन गंगापूर रोडवरील सारस्वत बॅंकेत भरण्यासाठी दुचाकीवरून आले. बॅंकेमध्ये गर्दी असल्याने दोन कर्मचारी वेगवेगळ्या रांगेमध्ये उभे राहिले तर एकाच्या हातामध्ये रोकडची पिशवी होती. त्यावेळी त्याच्याजवळ असलेल्या संशयिताने खाली पैसे पडल्याचे त्या कर्मचाऱ्यास सांगितले. त्याने पाहिले असता, पैशांचे बंडल खाली पडलेले होते. कर्मचाऱ्याने त्याच्या हातातील रोकडची पिशवी काऊंटरवर ठेवत पैसे घेण्यासाठी खाली वाकला.

तेवढ्या वेळात संशयिताने 28 लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केली. कर्मचाऱ्याने काऊंटरवरील रोकडची पिशवी गायब झाल्याचे पाहिल्यानंतर लुट झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत संशयित पसार झाले होते. 

दरम्यान, पोलिसांनी बॅंकेच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता, त्यामध्ये एक संशयित रोकडची पिशवी घेऊन घाईघाईने जाताना दिसतो तर त्याच्यामागे त्याचे दोन साथीदारही जात असल्याचे कैद झाले आहे. आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी बॅंकेच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्याचे फुटेज पोलिसांनी तपासले असता, त्यामध्ये सदरचा प्रकार कैद झाला आहे. त्यानुसार पोलीस संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून काही मार्गांवर नाकाबंदी करून तपासणी सुरू केली गेली.

Web Title: 28 lacks looted of aadgaokar jwellers