त्र्यंबकेश्‍वरच्या तीन पुरोहितांची प्राप्तिकरकडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नाशिक : नारायण नागबळी, त्रिपिंडी अशा धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथील पुरोहितांची मिळकत ही सामान्यांच्या चर्चेचा विषय आहे. परंतु आता नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर येथील पुरोहितांवर प्राप्तिकर विभागाचीही नजर गेली आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील तीन पुरोहितांची गेले दोन दिवसांपासून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यातील दोन जणांचा पौरोहित्याखेरीज बांधकामसाहित्य विक्रीचाही व्यवसाय आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथे पूजेसाठी देशभरातून अनेकजण येत असतात. त्यामध्ये उद्योगपती, वरिष्ठ सरकारी अधिकारी, न्याय, प्राप्तिकर खात्यातील उच्चपदस्थांचाही समावेश असतो. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरमधील पुरोहितांना प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे येणे जाणे नवीन नाही. परंतु दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वरमध्ये ठाण मांडून बसलेल्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे आगमण हे पूजेसाठी नाही, तर उत्पन्न तपासणीसाठी झाल्याने सर्वांचेच चेहरे चिंताक्रांत झाले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन पुरोहितांकडेच चौकशी सुरू केली असली, तरी त्यांच्याकडे 52 जणांची यादी असल्याचे बोलले जाते. या मुळे ही तपासणी पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचीही चर्चा आहे.

सध्या नाताळाच्या सुट्यांमुळे त्र्यंबकेश्‍वरमध्ये भाविकांच्या गर्दीचा ओघ आहे. त्यातच ही तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे पूजेसाठी येणाऱ्या भाविकांबाबतही पुरोहितांमध्ये संशयाची भावना निर्माण झाली असून खात्री करून घेतल्यानंतरच पूजेचे बोलणे केले जात आहे.

बांधकाम विक्री व्यवसायामुळे छापे?
पौरोहित्यातून येत असलेल्या उत्पन्नातून अनेकांनी इतर व्यवसायही सुरू केले आहेत. त्यातील बांधकाम साहित्यविक्रीशी संबंधित पुरोहितांवरच छापे पडले आहेत. या मुळे या पुरोहितांनी साहित्य खरेदी केलेल्या व्यवसायिकांकडील कागदपत्रांमध्ये यांची नावे आढळल्यानेच येथील पुरोहितांवर छापे पडल्याचे बोलले जाते.

52 जणांची यादी
त्र्यंबकेश्‍वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वराच्या पूजा, सेवा आदींबाबतचे नियम चारशे वर्षांपासून ठरलेले आहेत. त्यातील तीर्थोपाध्याय पुरोहित वर्ग हा सर्वाधिक लाभार्थी आहे. तसेच या व्यवस्थेचा ज्या वर्गाला फायदा मिळत नाही, अशा घटकातील काहींनी आकसाने येथील पुरोहितांची यादी प्राप्तिकर विभागाला दिल्याचीही चर्चा आहे.

अनुभवातून कारवाई?
पूर्वजांच्या मुक्तीसाठी केले जाणाऱ्या श्राद्धाच्या दक्षिणेबाबत शास्त्रग्रंथांबाबत उत्पन्नाच्या एक षष्ट्यांश उत्पन्न देण्याचे उल्लेख आहेत. पुरोहितही यजमानाची आर्थिक परिस्थिती बघून त्याच्याकडून पूजेची दक्षिणा घेत असतात. त्यामुळे पुरोहितांच्या उत्पन्नाबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहे. त्र्यंबकेश्‍वरमध्ये पूजेला अनेकवेळा प्राप्तिकर विभागातील अधिकारीही येत असतात. त्यांच्याकडून किती दक्षिणा घ्यायची असा प्रश्‍न निर्माण होतो, त्यावेळी त्यांनी निश्‍चित रक्कम न सांगता उत्पन्नाच्या एक षष्ट्यांश दक्षिणा द्यावी, असे शास्त्रवचन सांगितले जाते. त्यावर ते देतील तेवढीच दक्षिणा घेतली जात असली, तरी या अधिकाऱ्यांना पुरोहितांच्या उत्पन्नाचा अंदाज अनुभवातून आला असल्यानेच त्यांनी या वेळी ही कारवाई केल्याचीही चर्चा आहे.

Web Title: 3 purohits from nashik questioned by it dept