महापालिकेत 300 कर्मचाऱ्यांच्या जम्बो बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

जळगाव - महापालिका प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांनी एकाच विभागात तीन वर्षे असलेल्या तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 116 लिपिक तर 184 शिपाई यांचा समावेश आहे. 

जळगाव - महापालिका प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांनी एकाच विभागात तीन वर्षे असलेल्या तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 116 लिपिक तर 184 शिपाई यांचा समावेश आहे. 

महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून काही कर्मचारी एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे कामात शिथिलता आल्याचे दिसून आले होते. याबाबत नागरिकांच्याही तक्रारी होत्या. त्यामुळे आयुक्त जीवन सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या एप्रिल महिन्यात करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी एकाच विभागात तीन व त्यापेक्षा जास्त वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी शिपाई व लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. यात कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलेले नाही. आस्थापनांकडून एकाच विभागात तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार उपायुक्तांनी बदलीची प्रक्रिया केली आहे. आस्थापना विभागातर्फे आज सायंकाळी 5 वाजता बदलीचे आदेश संबोधित कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेत. ज्या कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे, त्यांनी उद्या (ता.18) आपल्या पदाचा पदभार घ्यायचा आहे. 

बांधकाम, नगररचनात खळबळ 
महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागातील लिपिक व शिपाईपदावर असलेल्या कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून बदली झालेली नाही. अनेक अधिकारी आले तरी या विभागातील लिपिक व शिपाई आपली बदली सोईस्करपणे याच विभागात करून घेत होते असेही सांगण्यात येत आहे. आज आदेश जारी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बदल्या आयुक्तांनी "रॅन्डम'पद्धतीने केल्या आहेत. प्रभाग समित्या, दवाखाना, खुला भूखंड, घरपट्टी,अर्थविभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. 

अभियंते, वैद्यकीय विभाग आज 
बदल्याची प्रक्रिया सर्वच स्तरावर करण्यात येणार आहे. उद्या (ता. 18) बांधकाम, नगररचना, पाणी पुरवठा, विद्युत या विभागातील अभियंत्याच्या बदल्या केल्या जाणार आहे. या शिवाय दवाखाना विभागातील डॉक्‍टरांच्याही बदल्या करण्यात येणार आहे. त्यानाही एकाच विभागातील तीन वर्षाचा निकष लावण्यात येणार आहे. 

प्रशासकीय कामकाजात सुसूत्रतेसाठी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच विभागात तीन वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना नव्या विभागात नियुक्त करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत बदलीचे आदेश रद्द केले जाणार नाहीत. 

- जीवन सोनवणे, आयुक्त, महापालिका जळगाव. 

Web Title: 300 employees of the Corporation transfers