स्थगित ३२८ बांधकामांच्या परवानगींची पुनर्तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

जळगाव - महापालिकेतील नगररचना विभागाच्या तत्कालीन सहाय्यक संचालकांनी जुन्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार दिलेल्या शहरातील ३२८ बांधकामांच्या परवानगीचा विषय वादग्रस्त ठरत आहे. त्यामुळे या सर्व परवानगींची नव्याने तपासणी करण्याच्या सूचना आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिल्या आहेत. या परवानगींमधील गैरप्रकार झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व ३२८ बांधकाम परवानगी प्रकरणांना आयुक्तांनी याआधीच स्थगिती दिली आहे. 

दरम्यान, या परवानगींची नव्याने होणाऱ्या तपासणीबाबत आयुक्त गंभीर असून, येत्या सात दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी नगररचना विभागाला दिल्या आहेत. जळगाव महापालिकेतील नगररचना विभागाचा कारभार नेहमीच चर्चेचा व महासभांमधील वादाचा विषय ठरला आहे. अनेकवेळा महासभांमधून या विभागातील अधिकारी, अभियंत्यांना धारेवर धरण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सहाय्यक अभियंत्यांच्या निलंबनाचे प्रकरण याच विभागातून पुढे आले होते. त्यात या बांधकाम परवानगीच्या विषयाने आता नव्याने भर घातली आहे.

महापालिकेचे बदली झालेले नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम यांनी २० सप्टेंबर २०१६ ला शासनाने नवीन बांधकाम विकास नियंत्रण नियमावली लागू केली होती. मात्र, नगररचना विभागात बांधकाम परवानगींच्या अर्जांना जुन्या नियमांच्या निकषांनुसार परवानगी देण्यात आली होती. पाच-दहा नव्हे, तर अशी ३२८ प्रकरणे होती. हा गैरप्रकार महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यावर आयुक्त सोनवणेंनी या सर्व बांधकामांच्या परवानगीला स्थगिती दिली आहे. त्यानुसार या बांधकामधारकांना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यातच आजपासून बांधकामांच्या परवानगींची पुनर्तपासणी कामाबाबत नगररचनातील अभियंत्यांकडे जबाबदारी दिली. सात दिवसांत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त सोनवणेंनी नगररचना विभागाला केल्या आहेत. 

नियमानुसारच देणार परवानगी
स्थगिती दिलेल्या ३२८ बांधकामांच्या प्रस्तावांची छाननी केली जात असून, त्यात बांधकाम हे शासनाने लागू केलेल्या नव्या विकास नियंत्रण नियमावलीत बसत आहे हे की नाही, हे बघितले जात आहे. त्यानुसार नियमात बसणाऱ्या बांधकामांना परवानगी दिली जाणार असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: 328 suspended construction of permission recheaking