नामपूर बाजार समितीमध्ये कांदा व्यापाऱ्याने थकविले शेतकऱ्यांचे 36 लाख रुपये

प्रशांत बैरागी
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नामपुर (नाशिक) : कांद्याचे घसरलेले भाव, दुष्काळी परीस्थिती, सततची नापिकी, वाढती महागाई, आदी संकटांवर मात करून काबाडकष्ट करून पिकविलेल्या कांद्याच्या विक्रीनंतरही दोन ते तीन महिने कांद्याची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नामपूर बाजार समितीचे अध्यक्ष यांच्या दालनात ठाण मांडून बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. शेतकऱ्यांच्या अडकलेल्या सुमारे 36 लाख रूपयांच्या रकमेसाठी  बाजार समिती प्रशासन काय तोड़गा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नामपुर (नाशिक) : कांद्याचे घसरलेले भाव, दुष्काळी परीस्थिती, सततची नापिकी, वाढती महागाई, आदी संकटांवर मात करून काबाडकष्ट करून पिकविलेल्या कांद्याच्या विक्रीनंतरही दोन ते तीन महिने कांद्याची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नामपूर बाजार समितीचे अध्यक्ष यांच्या दालनात ठाण मांडून बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. शेतकऱ्यांच्या अडकलेल्या सुमारे 36 लाख रूपयांच्या रकमेसाठी  बाजार समिती प्रशासन काय तोड़गा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

येथील बाजार समितीच्या आवारात सटाणा येथील कांदा व्यापारी अकील शेख हे कांदा खरेदी करतात. जानेवारी महिन्यापासून त्याने खरेदी केलेल्या कांद्याचे चेक वटत नसल्याने मोसम खोऱ्यातील शेकड़ो कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे.

याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी आल्यानंतर मार्च महिन्यापासून बाजार समितीमधील शेख याची खरेदी थांबविण्यात आली असून नविन आर्थिक वर्षात त्यांच्या परवाना नूतनीकरण रोखण्यात आला आहे. अन्य राज्यामधील व्यापाऱ्यांकडे पैसे अडकल्याने शेतकऱ्यांच्या देणे देण्यास विलंब होत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. १७ एप्रिलला सर्व शेतकऱ्यांचे थकित पैसे अदा करेन असे लेखी आश्वासन व्यापारी अकील शेख यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले होते. त्यामुळे सकाळी अकरा वाजेपासून बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली.

आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या थकित रकमेबाबत संबंधित कांदा व्यापारी अकील शेख, बाजार समितीचे अध्यक्ष अविनाश व संचालक मंडळ यांना जाब विचारला. यानंतर बाजार समितीचे अध्यक्ष अविनाश सावंत यांनी तातडीने कांदा व्यापारी यांची बैठक घेतली. मोसम खोऱ्यातील सुमारे १३० हुन अधिक शेतकऱ्यांचे धनादेश बाउंस झाले आहेत.

गेल्या महिनाभरापासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. परंतु मजुरांची देणी देण्यासाठी शेतकरी मातीमोल भावाने कांद्याची विक्री करीत आहे. दोन-तीन महिन्यांपासून कांदा विक्रीचे पैसे मिळत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेला अक्षय तृतीया सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. वायगांव येथील अहिरे नामक शेतकऱ्याचे वडील मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून कांद्याचे पैसे अड़कल्याने आपल्या वडिलांना डिस्चार्ज मिळत नसल्याची खंत त्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

गेल्या वर्षीही येथील एका कांदा व्यापाऱ्यांने वेळेत शेतकऱ्यांचे पैसे वेळेत न दिल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांची थकित रक्कम परत मिळवून दिली होती.  यावेळी बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब सावंत, किरण देवरे, भाऊसाहेब अहिरे, दिपक पगार, समिर सावंत, सचिव संतोष गायकवाड, सहसचिव अरुण अहिरे, अशोक सावंत, शशिकांत कोर, आदींसह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

मी जानेवारी महिन्यात येथील बाजार समितीत कांदा विकला होता. कांद्याचे ४६ हजार रूपये अकील शेख या व्यापाऱ्याकडे अडकले आहेत. रक्कम मिळत नसल्याने आईच्या आजारपणावर उपचार करणे अशक्य झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करून पिकविलेल्या कांद्याचे रूपये वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची घोर फसवणुक झाली आहे.

- पप्पू धोंडगे, कांदा उत्पादक, खामलोण

Web Title: 36 Lakhs rupees of Onion farmers pending in Nampur Market Committee