
Child Marriage : धुळे जिल्ह्यात 4 बालविवाह रोखले! बालसंरक्षण समितीस यश
धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे.
त्यास प्रतिसाद म्हणून अनेक नागरिक स्वत:हून पुढे येऊन बालविवाहाबाबत (child marriage) प्रशासनास माहिती देत आहेत. (4 child marriages prevented in Dhule district Success to Child Protection Committee dhule news)
नागरिकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बालसंरक्षण समितीस यश आले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली.
१३ मार्च २०२३ ला वेहेरगाव फाटा (ता. साक्री) येथे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइनवर प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन अधिकारी राकेश नेरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी समन्वय साधून जिल्हा बालसंरक्षण कक्षातील देवेंद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) ज्ञानेश्वर पाटील,
चाइल्ड लाइन प्रतिनिधी यांची टीम तयार करून संबंधित गावाचे पोलिसपाटील, ग्रामसेवक अमोल भामरे, सरपंच यांच्याशी संपर्क साधला. निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी वेहेरगाव येथील प्रकरणात तत्काळ दखल घेऊन पोलिस शिपाई रतन मोरे यांच्यासोबत या कार्यालयाच्या टीमने वेहेरगाव येथे भेट देऊन कार्यवाही केली. या गावात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा एकाच मांडवात होणारा बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
वधू-वरांना हळद
दुसऱ्या एका प्रकरणात धुळे शहरातील देवपूर भागातील नागसेननगर येथे बालविवाह होत असल्याची तक्रार देवपूर पोलिस ठाण्यात येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक एम. डी. निकम यांनी या प्रकरणात तत्काळ दखल घेऊन जिल्हा बालसंरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) तृप्ती पाटील, देवपूर पोलिस ठाण्याचे सागर थाटसिंगार, सुनील गवळे, रोहिदास अहिरे, एस. एस. पाटील, दिलीप वाघ, बी. वाय. नागमल, ए. व्ही. जगताप यांच्या सहकार्याने बालविवाह रोखण्याची कार्यवाही केली.
वर-वधू यांना हळद लागली होती अशा स्थितीतही वर व वधू यांना हळदीच्या कपड्यांसह बालकल्याण समिती, धुळेसमोर उपस्थित करण्यात आले. तिसऱ्या प्रकरणात मालपूर (ता. शिंदखेडा) येथे १७ मार्च २०२३ ला बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी (संख्याबाह्य) देवेंद्र मोहन व चाइल्ड लाइनचे ज्ञानेश्वर पाटील यांनी १४ मार्चला संबंधित ठिकाणी पोलिस विभाग, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांच्या मदतीने बालविवाह रोखला. त्यांना १५ मार्चला बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले.
वडिलांकडून घेतले हमीपत्र
संबंधित बालविवाह होणाऱ्या ठिकाणी बालक व बालिका यांचा जन्मपुरावा तपासणी करून बालिका १८ वर्षांखालील असल्याचे खात्री पटविल्यानंतर लगेच लग्नघरी वरपक्ष व वधूपक्ष यांना एकत्र बसवून बालविवाहाबाबतचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार होणारी कारवाई याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली व संबंधितांना बालकल्याण समिती, धुळे यांच्यासमोर उपस्थित करून मुलीच्या वडिलांकडून मुलीचे १८ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.