नाशिकमध्ये चार वाडे कोसळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

भोई गल्ली येथील कांबळे वाडा दुपारी चारच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, मेन रोडवरील दोन आणि अशोक स्तंभावरील एक, असे चार वाडे एकाच दिवसात कोसळले.

जुने नाशिक - भोई गल्ली येथील कांबळे वाडा दुपारी चारच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, मेन रोडवरील दोन आणि अशोक स्तंभावरील एक, असे चार वाडे एकाच दिवसात कोसळले.

शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस शहरात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे विविध भागात वाडे आणि वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. रविवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने जुने नाशिक, भोई गल्ली येथे धोकादायक अवस्थेत असलेला कांबळे वाडा दुपारी चारच्या सुमारास कोसळला. 

गेल्या अनेक दिवसांपासून वाडा हलत असल्याची तक्रार नागरिक करीत होते. शिवाय महापालिकेकडेही कांबळे कुटुंबीयांनी वाडा उतरविण्याचा विनंती अर्ज केला होता. महापालिकेकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले. रविवारीदेखील सकाळपासून वाडा कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचेही कांबळे कुटुंबीयांनी महापालिकेस कळविल्याचे त्यांनी सांगितले. कुणी याकडे लक्ष दिले नाही. दुपारी वाडा कोसळल्यावर मात्र अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. दरम्यान, वाडा अतिशय धोकादायक अवस्थेत असल्याने विक्रम कांबळे यांचे कुटुंबीय वाड्याच्या बाहेर निघून आले होते.

त्यामुळे जीवितहानी टळली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. कांबळे वाड्याचा काही भाग शेजारील सोमनाथ घटमाळे यांच्या पत्र्याच्या घरावर कोसळल्याने त्यांचे आणि कांबळे कुटुंबीयांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. वाडा कोसळण्याची माहिती अग्निशमन विभागास मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत वाड्याचा अन्य धोकादायक भाग उतरवून घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, मेन रोड येथील दुसाने आणि लभडे वाडा, तसेच अशोक स्तंभ भागातील जुना वाडा रविवारी सकाळच्या सुमारास कोसळण्याच्या घटना घडल्या. तीनही बंद अवस्थेत असल्याने कुठल्या प्रकारचे नुकसान झाले नाही. 

दरम्यान, सोमवार पेठ येथे एका दुकानावर वृक्षाचा काही भाग कोसळण्याचा प्रकार घडला. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षाच्या फांद्या रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 Old Building Collapse in nashik