धुळे : शिरपूर येथून पाच लाखांची रोकड ताब्यात; पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

 मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ 11 ऑक्टोबरच्या रात्री एका कारमधून पाच लाख रूपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली.

 

 

 

 

 

 

 

 

++

शिरपूर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ 11 ऑक्टोबरच्या रात्री एका कारमधून पाच लाख रूपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे, मद्य व संशयास्पद रोख रकमेची वाहतूक रोखण्यासाठी मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात पथके तैनात करून विशेष माेहीम राबवण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता पळासनेर येथील महामार्गालगत असलेल्या आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी संशयावरून कार (एमएच १८-९०९९) थांबवून तपासणी केली. कारमधील बॅगमध्ये ५०० व २०० रूपयांच्या नोटांची एकूण १३ बंडले आढळली. या कारवाईत एकूण पाच लाख रूपये पोलिसांनी ताब्यात घेतले.

कारमधील युवराज अरविंद शिंदे (रा.कॉटन मार्केटमागे, धुळे) यांनी ही रक्कम त्यांच्या मालकीची असून व्यवसायाशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांना रकमेच्या मालकीसंदर्भात अधिक पुरावे व संबंधित कागदपत्रे सादर करावीत असे निर्देश पोलिसांनी दिले. सहायक निरीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Lakhs rupees Seized in Shirpur Dhule