पाच हजार एलईडी दिव्यांनी शहर उजळणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

नाशिक - गेल्या पंचवार्षिकमध्ये गाजलेल्या ‘एलईडी’ प्रकरणाला हात न लावता बंद पडलेल्या पाच हजार पथदीपांवर नव्याने एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका स्वनिधीतून खर्च करणार असून, अंदाजपत्रकात नव्याने तरतूद केली जाणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी आज सांगितले.

नाशिक - गेल्या पंचवार्षिकमध्ये गाजलेल्या ‘एलईडी’ प्रकरणाला हात न लावता बंद पडलेल्या पाच हजार पथदीपांवर नव्याने एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका स्वनिधीतून खर्च करणार असून, अंदाजपत्रकात नव्याने तरतूद केली जाणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी आज सांगितले.

गेल्या पंचवार्षिकमध्ये एलईडी दिवे बसविण्याचा मुद्दा गाजला होता. हैदराबाद येथील एका कंपनीला शहरात सत्तर हजारांहून अधिक फिटिंग बसविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. प्रारंभी तेराव्या वित्त आयोगातून एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर नगरसेवकांच्या पत्राची जोड देऊन महापालिकेनेसुद्धा खर्च करण्याची तयारी दर्शवत खासगीकरणातून दिवे बसविण्यास संमती दिली होती. त्यामुळे सुमारे ६७ कोटी रुपयांचे एलईडी दिवे बसविण्याचे काम थेट सव्वादोनशे कोटी रुपयांपर्यंत पोचल्याने वादग्रस्त ठरले होते. त्यात पुन्हा ठेकेदाराला ऐंशी कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी दिल्याने न्यायालयाने फटकारलेदेखील होते. त्या आधारे ठेकेदाराने बॅंक गॅरंटीच्या माध्यमातून दिवे बसविण्याचा प्रयत्न केला; परंतु तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या प्रयत्नांमुळे बॅंकेला नकार देण्यात आल्याने एलईडी बसविण्याचे काम थंडावले. एलईडी दिवे बसविले जाणार म्हणून नवीन दिवे बसविण्याचे काम थांबविण्यात आले. अद्यापपर्यंत शहरात दिवे बसविले नाहीत. शहरात सुमारे सत्तर हजारांहून अधिक पथदीप आहेत. त्यातील पाच हजारांहून अधिक खांबांवर दिवे नसल्याने अनेक भागांत अंधार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये पाच हजार दिवे बसविण्यासाठी तरतूद करणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले.
 

आउटसोर्सिंगने स्वच्छता
शहरात अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. शासनाकडून नवीन सफाई कर्मचारी भरतीला मान्यता मिळत नाही तोपर्यंत आउटसोर्सिंग किंवा मानधनाचा पर्याय स्वीकारून सफाई कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचे महापौर भानसी यांनी माहिती दिली.

Web Title: 5000 led lamp in city