अबब..! वर्षभरात सव्वापाच लाख रुग्ण

Patient
Patient

नाशिक - महापालिकेच्या रुग्णालयात गेल्या वर्षभरात चार रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पाच लाख १६ हजार ५८४ रुग्णांची तपासणी झाली आहे. यावर कोणाचा विश्‍वास बसेल? पण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हा दावा एका प्रस्तावाच्या माध्यमातून केला आहे. जर महापालिकेच्या रुग्णालयांमधून सव्वापाच लाख रुग्ण वर्षभरात तपासले गेले असतील तर महापालिकेच्या रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालये व उपचार घेणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. याचा एक अर्थ वर्षभरात निम्म्याहून अधिक नाशिककरांनी रुग्णालयात विविध उपचार घेतल्याने शहराचा आरोग्याचा निर्देशांक (दर) घसरला, हे वैद्यकीय विभागाला मान्य करावे लागेल.

महापालिकेतर्फे दरवर्षी रुग्णांच्या तपासणीचा अहवाल सादर केला जातो. यंदा महापालिकेने बिटको, झाकीर हुसेन रुग्णालयात यंत्रसामग्री, औषधे खरेदी व विविध पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करायची असल्याने गेल्या महासभेत एक अहवाल सादर केला. त्यात २०१८-१९ या वर्षात महापालिकेच्या चार रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणीची आकडेवारी सादर केली. त्या आकडेवारीनुसार पाच लाख १६ हजार ५८४ रुग्ण तपासल्याचा दावा केला आहे. वास्तविक महापालिकेच्या रुग्णालयात पुरेसा स्टाफ नाही व योग्य सेवा मिळत नसल्याने नगरसेवकांकडून सातत्याने ओरड होते. महिला प्रसूतीसाठी महापालिकेचे चार रुग्णालये आहेत. येथे सेवा मिळत नसल्याने नाईलाजाने जिल्हा रुग्णालयात शहरातील महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. तीच सेवा ग्रामीण भागातील महिलांना देता येणे शक्‍य असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी बोलून दाखवितात.

यंत्रे, औषधे खरेदीचा खटाटोप
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दरवर्षी करोडो रुपयांची औषधे खरेदी केली जातात. कायम औषधांची टंचाई असताना रुग्णांची संख्या अधिक दर्शवून खरेदीचा सपाटा लावला जातो. सीटीस्कॅन, एमआरआयसह महागडी यंत्रे खरेदी करण्यासाठी आकडेवारी फुगविल्याचे बोलले जात आहे. 

असून अडचण नसून खोळंबा
कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाची स्थिती काही वेगळी नाही. रुग्णालयाची भव्य अशी इमारत येथे बांधून ठेवली आहे. पण साथीच्या आजाराव्यतिरिक्त अन्य कुठल्या आजारांवर येथे उपचार होत नाहीत. 

कार्डियाक रुग्णवाहिका धूळखात
कोटी रुपये खर्चून महापालिकेने काही वर्षांपूर्वी कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली. त्यानंतर राज्यपाल, राष्ट्रपती दौरे आणि अन्य एक वेळेस ती रुग्णालयाबाहेर पडली. त्यानंतर मात्र आजपर्यंत भांडार, महापालिका मुख्यालय विविध रुग्णालयांत पडून होती. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ती रुग्णवाहिका डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आवारात धूळखात आहे. वापराअभावी त्यातील व्हॅन्टिलेटरसह अन्य यंत्रणा नादुरुस्त झाली आहे.

महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरविली जाते. अनेकदा एक रुग्ण पाच ते सहा वेळेसदेखील तपासणी किंवा उपचारासाठी येऊ शकतो.
- डॉ. राहुल गायकवाड, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, नाशिक महापालिका

उपचार केल्यानंतरही त्यांची मानसिकता खासगी रुग्णालयात जाण्याची असते. दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या अभावामुळे गंभीर आजारांवर उपचार होत नाहीत. त्यामुळेही काही रुग्ण खासगी रुग्णालयात जातात. 
- अनिता हिरे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय 

अतिदक्षता विभाग, बाल अतिदक्षता विभाग, सोनोग्राफी यंत्र नाही. तज्ज्ञ डॉक्‍टरांचा अभाव अशा विविध प्रकारच्या आवश्‍यकता यंत्रणेच्या अभावाने इच्छा नसताना रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते.
- जुबेर हाश्‍मी, जिल्हा रुग्णालय कल्याण समिती सदस्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com