पुण्यातून सहा मारेकऱ्यांच्या आवळल्या मुसक्‍या

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जुलै 2019

अटकेतील संशयित पोलिस कोठडीत
याप्रकरणी शनिवारीच पोलिसांनी इच्छाराम पुंडलिक वाघुळदे याला ताब्यात घेतले होते. त्यास तपासाधिकारी सचिन बेंद्रे यांच्यासह पोलिस पथकाने काळा बुरखा टाकून जिल्हा न्यायालयात हजर केले. न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात कामकाज होऊन संशयितास न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

जळगाव - येथील मू. जे. महाविद्यालयातील वाहनतळावर शनिवारी (ता. २९) किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी फरार झालेल्या मारेकऱ्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून मुसक्‍या आवळल्या आहेत. पुण्यास गेलेले तपास पथक मारेकऱ्यांना घेऊन रात्रीपर्यंत जळगावात पोचेल, असे सांगण्यात आले; तर दुसरीकडे शनिवारी रात्री ताब्यात घेतलेला इच्छाराम पुंडलिक वाघुळदे (वय २०, रा. मोहाडी रोड, जळगाव) याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने संशयिताला पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. 

शनिवारी (ता. २९) मू. जे. महाविद्यालयाच्या वाहनतळावर धक्का लागण्याच्या कारणाने तरुणांच्या गटाने मुकेश सपकाळे याच्यावर चाकूने हल्ला चढविला. त्यात मुकेशचा मृत्यू झाल्याने शिक्षण वर्तुळात तसेच शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी एकाला अटक केली होती. 

या पथकाची कामगिरी
गुन्ह्यातील अन्य सहा संशयितांना शोधण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, डॉ. निलाभ रोहन यांनी उपविभागातील सर्व ‘डीबी’च्या कर्मचाऱ्यांना संशयितांच्या शोधार्थ रवाना केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे संशयितांच्या अटकेसाठी विशेष तीन पथके तयार करण्यात येऊन पुणे, मुंबई आणि सुरतकडे ती रवाना करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी, विजयसिंग पाटील यांच्यासह पथकाने संशयिताचा माग काढत सकाळीच पुणे गाठले होते. पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संशयितांचा अचूक शोध घेत गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये किरण हटकर (नेहरूनगर, मोहाडी रोड, जळगाव), तुषार नारखेडे ऊर्फ नाऱ्या (रामानंदनगर, जळगाव), समीर सोनार, अरुण बळिराम सोनवणे (समतानगर, जळगाव) यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 people arrested in youth murder case crime