
Nandurbar News : खेळताना वीजतारेला स्पर्शाने चिमुकलीचा मृत्यू
Nandurbar News : वीज वितरण कंपनीच्या उच्चदाबाच्या लोंबकळलेल्या तारांमुळे वडाळी (ता. शहादा) येथे सहावर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.
लोंबकळलेल्या वीजतारेला स्पर्श झाल्याने जोरदार विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. (6 year old girl dies after touching electric wire while playing nandurbar news)
स्वाती सतीश जगताप (वय ६) असे चिमुकलीचे नाव आहे. सहा वर्षांच्या कोवळ्या जीवाचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने गाव सुन्न झाले आहे. चिमुकलीच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातून मोठ्या प्रमाणावर वीजवाहिन्या गेल्या आहेत, तर काही ठिकाणी तारा लोंबकळलेल्या आहेत.
एरवी घरातच राहणारी स्वाती आतेभाऊ व बहिणीसह घराच्या छतावर खेळत होती. त्या वेळी खेळता खेळता एका उच्चदाब असलेल्या वीजतारेला स्वातीचा चुकून स्पर्श झाल्याने तिला जोरदार धक्का बसला. यामुळे ती गंभीर जखमी झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र दाखल करण्याअगोदरच तिची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय तपासणीअंती तिला मृत घोषित केले. स्वातीचे वडील सतीश तुकाराम जगताप पिठाची गिरणी चालवून उदरनिर्वाह करतात.
मोहिदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत स्वातीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.