महापालिकेसाठी सरासरी 60 टक्के मतदान 

महापालिकेसाठी सरासरी 60 टक्के मतदान 

नाशिक - महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शहरात सरासरी 60 टक्के मतदान झाले. म्हसरूळ येथील साडेतीनशेहून अधिक मतदारांची नावे गायब झाल्यानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती वगळता शहरात सर्वत्र शांततेत मतदान झाले. दुपारी एकपर्यंत मतदानाची टक्केवारी जेमतेम गाठता येईल की नाही, अशी शंका वाटत असतानाच अचानकपणे अनेक भागांमध्ये लक्ष्मीदर्शन झाल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसले. भालेकर व आदर्श हायस्कूलसह शहरातील बारा मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहिल्याने मतदान प्रक्रियेला विलंब झाला. सिडको, पंचवटी, नाशिक रोड व पूर्व विभागातील बहुतांश प्रभागांमध्ये मतदारांची नावे इतर मतदारसंघात समाविष्ट झाल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. दहा ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला उशीर झाला. 

सकाळी साडेसातला शहरात एक हजार 407 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी साडेनऊपर्यंत शहरात सव्वासात टक्के, साडेअकराला 11 टक्के; तर दुपारी साडेबाराला 22 टक्के मतदान झाले. दुपारी तीननंतर शहरात सर्वत्र मतदानाचा टक्का वाढला. पश्‍चिम विभागात प्रभाग क्रमांक सात व बारा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ ठरल्याने येथे सकाळपासूनच मतदानासाठी चांगली गर्दी होती. येथे सायंकाळपर्यंत अनुक्रमे 59 व 58 टक्के मतदान झाले. सातपूर विभागात प्रभाग क्रमांक नऊ व दहा अधिक संवेदनशील ठरले. प्रभाग नऊमध्ये सायंकाळी मतदारांची संख्या वाढल्याने अधिक काळ मतदान प्रक्रिया सुरू राहिली. येथे भारतीय जनता पक्षाचे दिनकर पाटील व रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश लोंढे यांच्यात शिवीगाळ झाल्याने तणाव वाढला होता. सिडकोत मतदारयाद्यांचा घोळ झाल्याने असंख्य मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. उत्तमनगर येथे बोगस मतदार घुसविण्याच्या आरोपावरून एक पिकअप व्हॅन पोलिसांनी जमा केली. प्रभाग 28 मध्ये भाजपचे उमेदवार याज्ञिक शिंदे व शिवसेनेचे दीपक दातीर यांच्यात वाद निर्माण झाल्याची अफवा पसरल्याने पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढविला. पूर्व विभागात प्रभाग क्रमांक तेरामध्ये दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. रंगारवाडा येथे शिवसेनेचा बूथ दोनशे मीटर अंतराच्या आत ठेवण्यात आल्याने पोलिसांनी तो हटविला. त्यावरून पोलिस व शिवसैनिकांमध्ये वाद झाला. भालेकर हायस्कूल मैदानावर मतदान केंद्रात उमेदवार आल्याने पोलिसांना त्यांना बाहेर काढावे लागले. त्या वेळी समर्थक व पोलिसांमध्ये शाब्दीक वाद निर्माण झाला. नाशिक रोड भागात प्रभाग सतरा, अठरा व वीसमध्ये मतदार याद्यांमधील घोळ गोंधळाचे कारण ठरले. प्रभाग तीसमध्ये वडाळा गावात एका अपक्ष उमेदवाराने राजकीय पक्षांच्या उमेदवारांना येण्यास विरोध केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली; परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद टळला. पंचवटी विभागात म्हसरूळ येथे साडेतीनशेहून अधिक नावे मतदार यादीतून गायब झाल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्‍यात आणून "रास्ता रोको'चा प्रयत्न हाणून पाडला. 

सरासरी 60 टक्के मतदान 
महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत 67 टक्के मतदान झाले होते. आतापर्यंतच्या निवडणुकीतील ही सर्वाधिक टक्केवारी आहे. 1997 मधील निवडणुकीत 65 टक्के, 2002 च्या निवडणुकीत 55.39 टक्के; तर 2007 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते. 2012 च्या निवडणुकीत 58 टक्के मतदान झाले; तर आज सरासरी 60 टक्के मतदान झाले. लोकसंख्येचा विचार करता आजच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. दहा लाख 73 हजार मतदार होते. त्यापैकी सरासरी पाच लाख 82 हजारांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केले. 

मतदान यंत्रात बिघाड 
मतदान प्रक्रियेला सुरवात होण्यापूर्वीच प्रभाग क्रमांक सातमधील दहा क्रमांकाच्या मतदान यंत्रात बिघाड झाला. प्रभाग क्रमांक 29 मधील मतदान केंद्र क्रमांक 16 व 21 मधील मतदान यंत्रात बिघाड झाला. प्रभाग 31 मधील 43 बूथमधील मतदान यंत्रात बिघाड झाला. मतदान सुरू असताना प्रभाग 2 मधील मतदान केंद्र क्रमांक 22, प्रभाग 3 मधील मतदान केंद्र क्रमांक 36, प्रभाग 6 मधील मतदान केंद्र क्रमांक 25, प्रभाग 26 मधील सात क्रमांकाचे मतदान केंद्र व प्रभाग नऊमधील मतदान केंद्र क्रमांक 24 मधील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला विलंब झाला. 

मतदान यंत्रे सुरक्षितस्थळी, उद्या मतमोजणी 
मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्यानंतर आज सायंकाळनंतर मतदान यंत्रे सुरक्षित स्थळी नेण्यात आली. शहरात दहा ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी चार हजार 164 मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. गुरुवारी (ता. 23) सकाळी आठला मतमोजणी प्रक्रियेला सुरवात होईल. सकाळी साडेनऊपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती पडण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com