सौरऊर्जेतून तयार होणार ६३ किलोवॉट वीज

प्रकाश बनकर - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

महावितरणतर्फे छतावरील सौर वीजनिर्मितीचा उपक्रम हाती घेतल्यानंतर शहरात राज ऑटोमोबाईलने १०० ते १२० युनिटचे सौर पॅनेल बसविले आहेत. त्यामुळे राज ऑटोचे दोन ते तीन कार्यालय, सर्व्हिसिंग सेंटरला ही वीज देण्यात येते. यामुळे महिन्याला तीस हजार रुपयांची वीज बचत होत आहे.

- हेमंत खिंवसरा, व्यवस्थापकीय संचालक, राज ऑटोमोबाईल, औरंगाबाद

वीजबिलाच्या कटकटीपासून सुटका, परिमंडळात सोळा ग्राहकांचा पुढाकार; नेट मेट्रिंगद्वारे महावितरणला विकणार वीज

औरंगाबाद - पारंपरिक पद्धतीने वीजनिर्मितीबरोबरच आता अपारंपरिक स्त्रोतांचा वापर करून वीजनिर्मितीचा निर्णय महानिर्मितीने घेतला आहे. त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. घरघुती ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे परिमंडळातून १६ ग्राहक सौरऊर्जा पॅनेलच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी पुढे आले आहेत. हे ग्राहक ६१ किलोवॉट वीजनिर्मिती करणार आहेत. यामुळे विजेचा तुटवडा आणि महिन्याला येणाऱ्या बिलाची कटकट यापासून ग्राहकांना सुटका मिळणार आहे.

 

राज्यात पवनऊर्जा, सौरऊर्जा अशी अपारंपरिक ऊर्जा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेढा) व महावितरणच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस चालना देण्याचे धोरण अवलंबिले आहे. पर्यावरणपूरक असणारी सौरऊर्जा निर्मितीस चालना देण्यासाठी छतावरील सौरऊर्जा निर्मितीकडे महावितरण कंपनीने जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे ठरविले आहे. छतावरील सौरऊर्जा निर्मितीस औरंगाबाद परिमंडळात मार्च महिन्यापासूनच जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी ग्राहक सुविधा केंद्रांतून हे कसे उभे करावे, याची माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांच्या फायद्याची असलेल्या या सौर प्रणालीसाठी ग्राहकांनी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत १६ ग्राहकांनी सौरऊर्जासाठी आवश्‍यक असलेले मीटर आणि नेटमेट्रिंग घेतले आहेत. सौरऊर्जा व्होलटॅंक ऊर्जानिर्मिती यंत्रणाच्या माध्यमातून हे ग्राहक ६३.५ किलोवॉट वीजनिर्मिती करणार आहेत. दिवसाला लागणारी वीज यातून निर्माण केली जाणार आहे. यातून निर्माण झालेली जास्तीची वीज महावितरणच्या लाईनमध्ये नेट मेट्रीकच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे. याचा हिशेब वर्षाला काढण्यात येणार आहे. यातून महावितरणलाच्या लाईनमध्ये टाकलेल्या विजेशी संबंधित पैसे ग्राहकाला मिळणार आहे. यामुळे महिन्याला येणाऱ्या बिलाची कटकटही टळणार आहे. शहरातील हेमंत खिंवसरा यांनी मार्च महिन्यात याची सुरवात केली.

 

शहरात एमआयटी शिक्षण संस्थेत सौरऊर्जेच्या माध्यमातून एक मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते; तसेच शहरात अनेक ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात येत आहे.

 

एक किलोवॉट विजेवर भागते एका कुटुंबाची गरज

एक फॅन, दोन एलईडी, एक फ्रीज आणि एक एलईडी टीव्हीचा वापर असलेल्या कुटुंबाला महिन्याला साधारणतः ७५ युनिट वीज लागते. दोन कुटुंबांसाठी एक किलोवॉट सौरऊर्जा वीज महिनाभर पुरू शकते. एक किलोवॉटचे सौर ऊर्जाचे पॅनेल बसविण्यासाठी साधारणतः ७० हजार ते एक लाखापर्यंत खर्च येतो. एकदा केलेला खर्च संपूर्ण वीजबिल वाचवू शकतो. एवढेच नाही तर महावितरणला उरलेली वीज देऊन कमाईही होऊ शकते.

Web Title: 63 kW of power will be created solar project