मालेगावात 7 कोटींच्या ड्रायफ्रूटची विक्री

प्रमोद सावंत
शनिवार, 26 मे 2018

मालेगाव - शहरात रमजानच्या काळात खजूरची सर्वाधिक विक्री होते. त्याखालोखाल शहरातील पूर्व भागात सुमारे साडेसात कोटींचे ड्रायफ्रूट शहरवासीय खरेदी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

मालेगाव - शहरात रमजानच्या काळात खजूरची सर्वाधिक विक्री होते. त्याखालोखाल शहरातील पूर्व भागात सुमारे साडेसात कोटींचे ड्रायफ्रूट शहरवासीय खरेदी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
रोजा ठेवताना दिवसभर उत्साह व शक्ती असावी, यासाठी शक्तिवर्धक म्हणून ड्रायफ्रूटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. रमजान ईदला घरोघरी शिरखुर्मा तयार करण्यात येतो. त्यासाठीही दुधात ड्रायफ्रूट, शेवया व सुतरफेणी वापरतात. सकाळी सहेरीच्या वेळी (रोजाची सुरवात होताना) दुधात ड्रायफ्रूटचा मसाला टाकून दूध प्याले जाते. यामुळे खजुराखालोखाल काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड यांसह 15 प्रकारच्या ड्रायफ्रूटची विक्रमी विक्री होते. शहरात त्याला तुर्री मसाला संबोधले जाते. घरोघरी किमान एक हजार रुपयांचे ड्रायफ्रूट खरेदी होतात. पहिल्या दहा रोजांच्या दिवसांत तुर्री मसाला व अखेरच्या टप्प्यातील दहा दिवसांत शिरखुर्म्यासाठीचे ड्रायफ्रूट खरेदीसाठी गर्दी असते.

ड्रायफ्रूटमधून साकारतो तुर्री मसाला
काजू, बदाम, पिस्ता, किसमीस, चारोळी, शिंगाडा, चारमगज, आक्रोड, खसखस, वेलदोडा, खारीक, मखना-लाव्हा, खोबरे हे ड्रायफ्रूट कुटून त्याचे मिश्रण केले जाते. त्यालाच तुर्री मसाला म्हणतात. दूध मसाल्याप्रमाणेच सकाळी दुधात तुर्री मसाला टाकून दूध प्याल्यास दिवसभर शक्तिवर्धक म्हणून रोजा काळात मोठा लाभ होतो. याच मसाल्याचा वापर करून शिरखुर्मा बनविला जातो. उच्चभ्रू घरांत तुर्री मसाल्याऐवजी बदाम सरबत प्याले जाते. सर्वांत महागडा समजल्या जाणाऱ्या ममरा प्रकारच्या बदामची या काळात चांगली विक्री होते. ड्रायफ्रूटचे दर जीएसटीमुळे वधारले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे.

शहरात दिल्ली व मुंबईहून ठोक विक्रेते मोठ्या प्रमाणावर ड्रायफ्रूट मागवितात. पुणे येथूनही काही माल येतो. दीपावली, लग्नसमारंभ व रमजान या काळातच ड्रायफ्रूटची विक्रमी विक्री होते. रमजानची विक्री सर्वाधिक असते. सुमारे चारशे रुपयांचा तुर्री मसाला दैनंदिन रोजासाठी व पाचशे रुपयांचे ड्रायफ्रूट शिरखुर्म्यासाठी अशी एका घरी किमान एक हजाराचे ड्रायफ्रूट खरेदी होतात.
- सुभाष ब्राह्मणकर, ड्रायफ्रूट ठोक विक्रेते, मालेगाव

ठोक विक्रेते - 15
किरकोळ विक्रेते - 73 हून अधिक
तात्पुरता रोजगार - 100 जणांना

ड्रायफ्रूटचे सर्वसाधारण दर असे (किलोचे भाव)
काजू-800 ते 850
बदाम-700
पिस्ता-1400
किसमीस-240
चारोळी-700
शिंगाडा-120
चारमगज-160
आक्रोडमगज-1000
खसखस-600
वेलदोडा-1200
खारीक-80 ते 110
खोबरे- 200 ते 210

Web Title: 7 crore rupees dry fruit sailing in malegaon