मोबाईल चोरणाऱ्याला 7 वर्षांची सक्तमजुरी आणि 7 हजार रुपये दंड

मोबाईल चोरणाऱ्याला 7 वर्षांची सक्तमजुरी आणि 7 हजार रुपये दंड

नाशिक - धावत्या रेल्वेमध्ये युवकाच्या हातातील मोबाईल हिसकावून त्याला ढकलून देऊन त्याच्या जीविताला धोका उत्पन्न करणाऱ्या आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 7 वर्षांची सक्तमजुरी व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सागर उर्फ आकाश विलास जाधव (23) असे आरोपीचे नाव आहे. 

तक्रारदार मनोज हेमंत सोनवणे (21, रा. कल्याण पश्‍चिम, जि. ठाणे) हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारा युवक 11 फेब्रुवारी 2016 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्यासुमारास जनशताब्दी एक्‍सप्रेसने कल्याण ते औरंगाबाद असा प्रवास करीत होता. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून रेल्वे मार्गस्थ झाली असता, त्यावेळी तो डब्याच्या दरवाजाजवळ मोबाईलवर बोलत होता. त्यावेळी आरोपी सागर जाधव याने त्याच्या हातातील 6 हजार रुपये किमतीचा सॅमसंगचा मोबाईल हिसकावला आणि त्याला धक्का देऊन बाहेर ढकलले. त्यामुळे मनोज सोनवणे हा धावत्या रेल्वेतून खाली पडला. या अपघातामध्ये त्याच्या डोक्‍याला दुखापत झाली तर हाताचा पंजा व करंगळीचे हाड तुटले होते. त्याला उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नाशिकरोड पोलिसात दरोडा व जीविताला धोका उत्पन्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी खटला जिल्हा व सत्र न्यायधीश एन. जी. गिमेकर यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. रवींद्र निकम यांनी कामकाज पाहताना 5 साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी मनोज सोनवणे याच्यासह ज्याने चोरीचा मोबाईल विकत घेतला त्याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच परिस्थितीजन्य पुरावे आरोपी जाधव याच्याविरोधात सिद्ध झाले. त्याआधारे त्याला न्यायालयाने दरोड्यात 5 वर्षे सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिन्याचा कारावास, तसेच जीविताला धोका उत्पन्न केल्याप्रकरणी 7 वर्षे सक्तमजुरी व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावली. त्यानुसार, 7 वर्षे सक्तमजुरी व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा आरोपी जाधव याला भोगावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com