७६ घरकुलांचा परस्पर ताबा

Gharkul
Gharkul

जळगाव - दूध फेडरेशनजवळील उठविण्यात आलेल्या दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुल देण्यात येणार आहे. येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचे ‘लकी ड्रॉ’द्वारे वाटप करण्यात येणार होते. तत्पूर्वीच घरकुल असणाऱ्यांनी दिवाळीच्या सुटीदरम्यान कुलूप तोडून परस्पर ताबा घेतला. यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले. त्यामुळे या नागरिकांनी आज महापालिकेत धडक देत प्रशासनाला जाब विचारला. तसेच नंबरप्रमाणे घरकुल मिळावे, अशी मागणीही केली. यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील दूध फेडरेशनजवळील दांडेकरनगर झोपडपट्टी हटविताना येथील ४७२ घरे उठविण्यात आली होती. त्या सर्व कुटुंबांना पिंप्राळा- हुडको येथे घरकुल देण्याचे महापालिकेकडून निश्‍चित करण्यात आले होते. यापैकी २७६ घरकुलांचे वाटप गेल्यावर्षी करण्यात आले असून, आणखी तयार झालेल्या ७६ घरकुलांचे बांधकाम झाले आहे. या घरकुलांचे वाटप करण्यासाठी दिवाळीच्या सुटीनंतर ‘लकी ड्रॉ’ काढून वाटप करण्याचे महापालिकेकडून लाभार्थींना सांगण्यात आले होते. परंतु, या घरकुलांचे माजी नगरसेवकाच्या भावाकडून ज्यांना घरकुल मिळाले आहे, त्यांनाच घरकुलांचे वाटप करण्यात आले. याबाबत महापालिका प्रशासनही अनभिज्ञ असून, ‘लकी ड्रॉ’ न काढता महापालिकेने लावलेले कुलूप तोडून अनेकांनी या घरकुलांचा ताबा घेतला आहे.

महिलांचा आक्रोश
घरकुलांचा परस्पर ताबा घेतला असून, एका जणाकडे चार- पाच खोल्या आहेत. पण दोन वर्षांपासून एका खोलीसाठी ३३ हजार याप्रमाणे रक्‍कम भरली असून, अद्याप घरकुल मिळालेले नाही. यामुळे घरकुलाचा लाभ न मिळालेल्या नागरिकांनी आज सकाळी महापालिकेचे उपायुक्‍त लक्ष्मीकांत कहार यांच्या दालनाबाहेर गोंधळ घातला. तसेच पैसे भरूनही घरकुल न मिळाल्याने संतापलेल्या महिलांनी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्याकडे आक्रोश करत आपली व्यथा मांडली. तसेच ‘लकी ड्रॉ’द्वारे नव्हे; तर नंबरप्रमाणेच घरकुलांचे वाटप करण्याची मागणी केली. या नागरिकांनी महापौर सीमा भोळे यांचीही भेट घेऊन आपली व्यथा मांडली. 

महापालिका अनभिज्ञ
पिंप्राळा- हुडको भागात ७६ घरकुल बांधून पूर्ण झाले असून, ‘लकी ड्रॉ’द्वारे यांचे वाटप करण्यात येणार होते. परंतु दिवाळीच्या सुटीत म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी परस्पर घरकुलांचा ताबा देण्यात आला. याबाबत महापालिकेचे अधिकारीही अनभिज्ञ होते. शहर अभियंता सोनगिरे यांना यासंबंधी फोनवरून माहिती मिळाली होती. मात्र महापालिकेकडून घरकुलांचा ताबा देण्यात आला नसल्याचे सांगितले. तरीही ज्यांच्याकडे घरकुल आहेत, अशांना पुन्हा घर देण्यात आले आहे. ज्यांनी परस्पर घरांचा ताबा घेतला, त्यांची नावे यादीतून वगळून उरलेल्या लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सोनगिरे यांनी सांगितले.

वाटप पोलिस बंदोबस्तात
घरकुलांचा परस्पर ताबा घेण्यात आलेल्यांविरोधात महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सर्व ७६ घरकुलांचा परस्पर ताबा घेण्यात आला असून, त्यांना खाली करण्याबाबतची मागणी तक्रारीतून केली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक शिंदे यांच्याशीही चर्चा करून ज्या दिवशी ‘लकी ड्रॉ’द्वारे घरकुलांचे वाटप होईल, त्या दिवशी पोलिस बंदोबस्तात सर्व प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सोनगिरे यांनी सांगितले.

ज्याप्रमाणे उठविले गेले, त्या क्रमानुसार घरकुलांचे वाटप करावे. महापालिकेचे कुलूप तोडून काही जण घरात घुसले आहेत. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी नव्हते. आम्ही पैसे भरले असून घरकुल मिळावे, यासाठी आता ‘लकी ड्रॉ’ नको; तर नंबरप्रमाणे घरे मिळावी.
- कलाबाई विसावे, वंचित नागरिक  

खरे लाभार्थी बाजूलाच राहिले असून, ज्यांना याचा अगोदरच लाभ मिळाला; त्यांनीच पुन्हा घरकुलाचा ताबा घेतला आहे. याबाबत लवकर कारवाई होऊन आम्हाला आमच्या हक्‍काचे घर मिळायला हवे. दोन वर्षांपासून आम्ही महापालिकेकडे पैसे भरले आहेत.
- किशोर ढगे, वंचित नागरिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com