खरीप पिक कर्जासाठी येवल्यात 9 हजार शेतकरी पात्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

येवला : तालुक्यात खरीप पिक कर्जासाठी 9 हजार 207 पात्र लाभार्थी संख्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात १५ हजारांचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.जिल्हा बँक अडचणीमुळे शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज देऊ शकत नाही.त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तहसिलदारांसह अधिकारी सरसावले आहे.
तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील तलाठी,ग्रामसेवक व सोसायट्यांचे सचिव यांची विशेष बैठक घेऊन मदतीला पुढे येण्याचे आवाहन केले.

महसूल, सहकार व ग्रामविकास यंत्रणा संयुक्तरीत्या थेट शेतकऱ्यांच्या दारी जावून अर्ज,आवश्यक कागदपत्रे भरून घेणार आहेत.कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या आदेशान्वये तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. शुक्रवारी बहिरम यांनी गावोगावची जबाबदारी देण्यात आलेले तलाठी,ग्रामसेवक व सोसायट्यांचे सचिव यांची बैठक घेऊन याविषयी सूचना केल्या.तालुक्यात विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या 15 शाखा असून त्यातील 13 शाखांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज वाटपासाठी काही निकष निश्चित केलेले असून शेतकऱ्यांना हे खरीप पिक कर्ज मिळविण्यासाठीचे अर्जांसह कागदपत्रे भरून घेण्यासाठी तालुक्यातील 124 गावांसाठी तलाठी,ग्रामसेवक व सोसायटी सचिव यातील प्रत्येकी एकाची नियुक्ती करण्यात आली आहे.कर्ज प्रकरणी लागणारे आधार कार्ड,निवडणुक ओळखपत्र व पन कार्ड यापैकी कुठलेही दोन ओळखपत्रे यांची प्रत यासाठी जमा करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

एक लाखाच्या आत पिक कर्जासाठी कुठलाही जामीनदार लागणार नसून, दोन लाखांपर्यंत कर्जासाठी दोन जामीनदारांसह त्यांची आवश्यक कागदपत्रे लागणार आहे. त्यामुळे गावोगावी नेमलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांचे परिपूर्ण अर्ज भरून घेवून ते त्या त्या भागासाठी नेमून दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेत जमा करावेत. शेतकरी पिक कर्ज घेण्यास इच्छुक नसल्यास त्याचे नमुन्यात लेखी पत्र घ्यावे,एक आठवडयाच्या आत नेमून दिलेल्या गावी जावून प्रत्येकाने दिलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचनाही यावेळी तहसिलदार बहिरम यांनी दिल्या.बैठकीत सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील,सहकार अधिकारी आर. पी. जाधव,विजय बोरसे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक सागर सोमासे आदि उपस्थित होते.

Web Title: 9 thousand farmers eligible for kharip crop loan in yeola