अबब.. नऊशे किलोची कढई!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

जळगाव - मराठी प्रतिष्ठानतर्फे सुमारे अडीच हजार किलोचे वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्‍वविक्रम शुक्रवारी (ता. २१) शहरातील सागर पार्क मैदानावर होणार आहे. यासाठी साडेपाचशे किलोची कढई, तर साडेतीनशे किलो वजनाचे स्टॅण्ड अशी नऊशे किलो वजनाची भली मोठी कढई आज ट्रकमधून शहरात आणण्यात आली, तर क्रेनच्या सहाय्याने ही कढई बाहेर काढण्यात आली.

मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर हे अडीच हजार किलोचे वांग्याचे भरीत तयार करणार आहे. यासाठी आज नागपूरहून ट्रकमध्ये तब्बल नऊशे किलो वजनाची कढई, तर प्रत्येकी अकरा फुटांचे तीन सरोटे; जे शंभर किलोचे आहेत व अकरा फुटांचे झाकण शहरात आणण्यात आले. विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने कढई उतरविण्यात आली. या कढईचा घेर दहा बाय दहा फुटांचा आहे. कोल्हापूर येथील स्फूर्ती इंडस्ट्रीजमध्ये ही कढई तयार करण्यात आली आहे. या कढईचा प्रथम वापर हा गेल्या महिन्यात नागपूर येथे खिचडी तयार करण्यासाठी करण्यात आला. 

दिग्गजांची उपस्थिती
शोभायात्रेला मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्यासह हॉटेल कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन विठ्ठल कामत उपस्थित राहणार आहेत. विश्‍वविक्रमाच्या दिवशी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती राहील. यासोबतच शहर, जिल्हा, विविध राज्यांसह देशातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले आहे.

कढईची निघणार भव्य शोभायात्रा
तब्बल नऊशे किलोची कढई ही भली मोठी असल्याने नागरिकांना ही कढई बघता यावी यासाठी शहरात सोमवारी (ता. १७) दुपारी चारला भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा काव्यरत्नावली चौकातून निघून आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, नवीन बसस्थानक, शिवाजी पुतळा, नेहरू चौकमार्गे टॉवर चौकात येईल. पुढे चित्रा चौक, शिवाजी पुतळामार्गे पुन्हा काव्यरत्नावलीपर्यंत नेण्यात येईल.

Web Title: 900 kilo weight kadhai brinjal bharit world record