जिल्ह्यामध्ये वर्षभरात नऊशे जणांना सर्पदंश!

भूषण श्रीखंडे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

शास्त्रीय प्रथमोपचार 

  • साप चावलेल्या व्यक्तीला मानसिक धीर द्यावा, झोपू देऊ नये.  
  • चालायला लावू नये, म्हणजे विष लवकर पसरत नाही. 
  • बिनविषारी साप असेल, तर फक्त जखम धुवून जंतुनाशक औषध लावावे.
  • रुग्णाला काही तास नजरेसमोर ठेवणे आवश्‍यक असते. 
  • संपूर्ण हात किंवा पाय लवचिक पट्टीने (इलॅस्टिक क्रेप बॅंडेज) बांधावा. यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरत नाही. 
  • विष रक्तातून न पसरता मुख्यतः रससंस्था किंवा लसिकातून पसरते. थोडा दाब दिला तरी यातला प्रवाह थांबतो. 
  • साप चावलेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात न्यावे. तसेच झापड येत नाही किंवा कुठून रक्त वाहत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे.

जळगाव - पावसाळा सुरू झाला, की रानावनात गर्द हिरवाई पसरून गारव्याच्या शोधात असणारे सर्पही या दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे याच दिवसांत दरवर्षी सर्पदंशाच्या घटना अधिक होत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार जून २०१८ ते ३० जुलै २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या ९०० नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले. त्यापैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवल्याची नोंद आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील पावसाळ्यापूर्वीचे नियोजन, मुबलक औषधसाठा व नागरिकांमध्ये सापांविषयी वाढलेली जागरूकता यामुळे सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत घट झाली आहे. 

सर्पदंशाच्या रुग्णास जिल्हा रुग्णालयासह ७७ प्राथमिक उपचार केंद्र, १८ आरोग्य केंद्र, ३ जिल्हा उपकेंद्र येथे मोफत उपचार मिळतो. जिल्हा रुग्णालयातर्फे पावसाळ्यापूर्वीच सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रावर लस, औषधींचा पुरेसा साठा ठेवण्यात आलेला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात. मात्र, जिल्हा रुग्णालय व प्राथमिक, आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर गेल्यास मोफत रुग्णास मिळत आहे.     

सहा महिन्यांत मृत्यू नाही
जिल्हा सामान्य रुग्णालयात यात १ जून ते ३१ डिसेंबर २०१८ या सहा महिन्यांच्या काळात ६१५ सर्पदंश रुग्ण उपचारासाठी आले होते. यात सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात ४  जणांचा मृत्यू झाला; परंतु जानेवारी २०१९ ते ३० जुलैपर्यंत आलेले २८५ सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले. त्यांना योग्य व वेळेत उपचार मिळाल्याने एकही रुग्ण दगावलेला नाही.       

शहरात वीसपेक्षा अधिक प्रजाती  
वन्यजीव संरक्षण संस्था २००८ पासून सापांच्या संरक्षणाचे कार्य करत असून, सुमारे ५२ सर्पमित्र यासाठी कार्यरत आहेत. शहरातही सापांच्या वीसपेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. संस्थेत कार्यरत सात सर्पमित्रांनी आपले मोबाईल क्रमांक हेल्पलाइन म्हणून जाहीर केले आहेत. एखाद्या भागात साप आढळल्यास त्यांना बोलावले जाते. हे सर्पमित्र तो साप पकडून सुरक्षितपणे लांब जंगलात नेऊन सोडतात.

सर्पदंश टाळण्यासाठी... 
  घरात, घराबाहेर अनावश्‍यक वस्तूंचा ढीग करू नये 
  सांडपाण्याचे पाइप उघडे न ठेवता जाळ्या लावणे.  
  घराच्या खिडक्‍यांपर्यंतच्या झाडाच्या फांद्या कापाव्या.  
  खिडक्‍यांना जाळी बसवावी. 
  रात्री बाहेर जाताना टॉर्च हवा. घराबाहेर उजेड असावा. 
  शेतात काम करताना बूट घालावा, गवत कापताना खात्री करावी. 
 अडगळीतले सामान काढताना दक्षता घ्यावी. 
  सर्पदंश झाल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात जावे. 
  साप आढळल्यास सर्पमित्रांना संपर्क करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 900 People bite by snake in last year