फाळकेच्या स्मृतीदिनी जन्मभूमी बहुतांश चित्रपटगृहे बंदच 

दत्ता जाधव
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नाशिकः भारतीय चित्रपटसृष्टीचे भीष्माचार्य व जनक कै. दादासाहेब उर्फ धुंडीराज गोविंद फाळके यांचा उद्या (ता.16) 74 वा स्मृतीदिन. नाशिक ही त्यांची जन्मभूमी. मात्र आज भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णयुग प्राप्त झालेले असतानाच दादासाहेबांच्या जन्मभूमीतील बहुतांश चित्रपटगृहे आता बंद पडली असून त्यांची जागा मल्टीप्लेक्‍सने घेतली आहे. 

नाशिकः भारतीय चित्रपटसृष्टीचे भीष्माचार्य व जनक कै. दादासाहेब उर्फ धुंडीराज गोविंद फाळके यांचा उद्या (ता.16) 74 वा स्मृतीदिन. नाशिक ही त्यांची जन्मभूमी. मात्र आज भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णयुग प्राप्त झालेले असतानाच दादासाहेबांच्या जन्मभूमीतील बहुतांश चित्रपटगृहे आता बंद पडली असून त्यांची जागा मल्टीप्लेक्‍सने घेतली आहे. 
दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकजवळील त्र्यंबकेश्‍वर येथील. मुंबईच्या सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टस्‌मधून पदवी संपादन केल्यावर त्यानी भारतीय चित्रपटसृष्टीचे स्वप्न पाहिले. यासाठी त्यांनी बायकोचे दागिने गहाण ठेवत थेट लंडन गाठत चित्रपट तयार करण्याची कला अवगत केली. यासाठी खास इंग्लंडमधून कॅमेराही मागविला. त्यानंतर त्यांनी 1913 ला "अयोध्येचा राजा' या मुकपटाची निर्मिती केली अन्‌ खऱ्या अर्थाने भारतात पडद्यावरील चित्र हलू लागले. त्यानंतर त्यांनीच चित्रपटाला बोलतेही केले. 

दादासाहेबांच्या निधनानंतर मुंबईत खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टी मोहोरून "बॉलीवूड'चा जन्म झाला. त्यानंतर राज्यातील मोठ्या शहरांसह सिनेमांच्या प्रदर्शनासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर थिएटर्स उभी राहिली. तशीच नाशकातही मोठ्या प्रमाणावर चित्रपटगृहे उभी राहिली. त्यात चुंबळे बंधुचे ऐतिहासिक विजयानंद, सर्कल, विकास, हेमलता, अशोक, प्रभात, मधुकर, चित्रमंदिर, दामोदर, महालक्ष्मी अशी दहा थिएटर्स नाशिक शहरात उभी राहिली. याशिवाय नाशिकरोड भागातही बिटको, रेजिमेंटल, अनुराधा थिएटरला प्रेक्षकांना मोठा प्रतिसाद लाभला. साठच्या दशकापासून नव्वदपर्यंत या सिनेमागृहांचा सुवर्णकाळ होता. 
सन 2000 नंतर राज्यभरात अत्याधुनिक सुविधा असलेली मल्टिप्लेक्‍स उभी राहिली. आरामदायी खुर्च्या, भव्य स्क्रिन, संपूर्ण वातानुकुलीन, दर्जेदार ध्वनीयंत्रणा यामुळे ही छोटी थिएटर्स कम मल्टिप्लेक्‍स जुन्या सिनेमागृहांपेक्षा अधिक दर आकारूनही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. त्यामुळे खऱ्या अर्थाने नव्वदच्या दशकानंतर मोठ्या सिनेमागृहांना घरघर लागली. प्रेक्षकांनीच पाठ फिरविल्याने कधीकाळी बुकींग ऑफीसवर दिसणारा "हाऊस फुल्ल'चा बोर्डही इतिहासजमा झाला. 
चालविणे बनले अवघड
अनेक रौप्यमहोत्सवी सिनेमा प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृह चालकांना सिनेमागृह चालविणे अवघड होऊन बसले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक थिएटर्स बंद पडत गेली. सद्यस्थितीत सर्वसामान्य नाशिककरांच्या करमणुकीसाठी चुंबळे बंधुचे विजयानंद व दामोदर अशी दोनच चित्रपटगृहे सुरू आहेत. तीही कशीबशी तग धरून, अशी परिस्थिती आहे.