पक्ष्यांनी गोदाकाठाला केलाय बाय-बाय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नाशिकः थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील गोदाकाठच्या पक्ष्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. दुसरीकडे सिमेंटच्या जंगलात कबुतरांच्या संख्येत वाढ झाली आहे. "पक्षी मोजू या...' उपक्रमातंर्गत नेचर क्‍लबतर्फे आठ दिवस करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. 
गाडगे महाराज धर्मशाळेच्या परिसरातील बगळे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. पण त्याचवेळी नाईट हेरॉन (रात बगळा)ची संख्या वाढल्याचे दिसून आले.

एवढेच नव्हे, तर परिसरात साळुंक्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. अमरधाम भागात गेल्यावर्षी तीस जातीचे पक्षी सर्वेक्षणात आढळले होते. यंदा गोदावरीच्या प्रदूषणाच्या विळख्यामुळे आठ प्रकारचे पक्षी दिसलेत. तसेच याच परिसरात विजेच्या खांबांवर घारींनी घरटी केली आहे. शहरातील विजेच्या तारांना मांजा लटकला असल्याने पक्षी जखमी होण्याची भीती सर्वेक्षण करणाऱ्यांना वाटली आहे. उपाय म्हणून तारांवरील मांजा काढण्याची मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

वृक्षतोडीमुळे इमारतींवर घरटी 
शहरात मोठ्याप्रमाणात देशी वृक्ष तोडल्यामुळे अनेक पक्ष्यांनी इमारतीवर घरटी तयार केल्याचे दिसून आले. पोपटांनी इमारतीच्या छिद्रामध्ये घरटे केल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. गोदापार्कच्या बाजूने उभारलेले गृहप्रकल्प पक्ष्यांनी इथून काढता पाय घेण्यास कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. खंड्या, शराटी, ग्रे हेरॉन, मध्यम बगळा, पान 
कोंबड्या, तितर यांचा त्यात समावेश आहे. चिमण्या, बुलबुल, सूर्य पक्षी, डव, चष्मावाला, पोपट, मैना, कोकीळ आदींचा रहिवास संकटात सापडला आहे. गव्हाणी घुबड लक्ष्मीचे वाहन अशी ओळख असली, तरीही अंधश्रद्धेमुळे घुबडांचे अस्तित्वात धोक्‍यात आल्याची बाब सर्वेक्षणातून स्पष्ट झाली. गोदावरीतील मासेमारीच्या जाळ्यात अनेक पक्ष्यांना अडकून मृत्युला सामोरे जावे लागले. उपक्रमात पक्षीमित्र उमेश नागरे, भीमराव राजोळे, मनोज वाघमारे, प्रमिला पाटील, सागर बनकर, आकाश जाधव, आशिष बनकर, गणेश जाधव, अभिषेक रहाळकर, समीर ठाकूर, रेणुका वारुंगसे, सायली महाजन, प्रियंका काठे, अमेय नेरकर, अमोल उबाळे आदी सहभागी झाले होते.