अंगणवाडी सेविकांचा बागलाण पंचायत समितीवर मोर्चा, शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

अंगणवाडी सेविकांचा बागलाण पंचायत समितीवर मोर्चा, शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

सटाणा : गेल्या दीड वर्षापासून थकीत मानधनाची रक्कम मिळावी तसेच अन्य विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी आज बुधवार (ता.3) रोजी बागलाण पंचायत समिती कार्यलयावर मोर्चा काढला. मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासन व प्रशासनाच्या विरोधात आंदोलक महिलांनी घोषणाबाजी करीत पंचायत समिती आवारातच ठिय्या आंदोलन छेडले. 

आज दुपारी 2 वाजता अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य सचिव राजेश सिंह, सरचिटणीस बृजपाल सिंह व तालुकाध्यक्षा रजनी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अंगणवाड्यांच्या सर्व सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शासन व प्रशासनाच्या विरोधात सुरु असलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमून गेला होता. पंचायत समिती आवारात मोर्चा येताच संतप्त आंदोलक महिलांनी ठिय्या दिला. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. 

निवेदनात 25 पेक्षा कमी मुले असतील तर ती अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समविष्ट कराव्यात या काढण्यात आलेला आदेश त्वरित रद्द करावा, अब्दुल कलाम योजनेची थकीत रक्कम त्वरित द्यावी, अंडी व केळीचे पैसे तातडीने द्यावे, जून 2017 पासून मानधन न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना थकीत मानधन रक्कम देण्यात यावी. ग्राम बालविकास केंद्राचे काम सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत करण्याची सक्ती रद्द करून आठवड्याची हक्काची सुट्टी द्यावी. लाईन लिस्टिंगच्या व बालआधार नोंदणीच्या कामाची सक्ती बंद करावी. योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर व मासिक अहवाल फॉर्मस वेळोवेळी द्यावे. रिक्त जागेवर सेविका व मदतनिसांची नियुक्ती करावी, अंगणवाडी केंद्राच्या लाभार्थ्यांना आहाराचे पैसे वेळेवर मिळावे, सेवासमाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना एकरक्कमी लाभाची रक्कम मिळवून देणे व वयोवृद्ध महिलांची होत असलेली उपासमार थांबवावी. पाच व दहा वाढीव रकमेचे फरकासह रक्कम देण्यात यावी. अरेरावी करणाऱ्या बागलाण प्रकल्पाच्या मुख्यसेविका के. व्ही. सुरंजे यांची त्वरित बदली करावी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, प्रकल्प कार्यलयाची साफसफाई करण्यासाठी मदतनीसांना प्रकल्प कार्यलयात बोलवणे बंद करावे, सन 2017 - 2018 ची 1000 रुपये भाऊबीज द्यावी, सन 2016 - 17 - 18 च्या निधीची रक्कम द्यावी, अतिरिक्त अंगणवाडी केंद्राचे काम करणाऱ्या सेविका व मदतनीसांना अतिरिक्त कामाचे पैसे द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर शासकीय कामाचे फोटो काढण्याची सक्ती करू नये यांसह विविध मागण्या प्रलंबित आहेत.

या सर्व मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. मोर्चात जिल्हाध्यक्षा राजश्री पानसरे, माधुरी पवार, जिजाबाई अहिरराव, कुसुम खैरनार, चंद्रकलाबाई बेडसे, गायत्री देसले, मनीषा कापडणीस, शालिनी मोरे, मंदाकिनी राजधर, हिराबाई ठाकरे, माया भामरे, सुनंदा बच्छाव, रंजना मगरे, वर्षा भामरे, रुपाली खरे, छाया भामरे, अनिता शेवाळे, केदाबाई अहिरे, ललिता सोनवणे, सुशीला अहिरे कलावती देवरे आदींसह तालुक्यातील सेविका, मदतनीस कार्यकर्त्या उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com