सांस्कृतिक समरसतेचा संदेश देणारा ‘आरंभ’

धनश्री बागूल
बुधवार, 4 जानेवारी 2017

जळगाव - भारतातून विदेशात स्थायिक झालेली व्यक्ती आपली संस्कृती विसरत नाही. मात्र, त्याच्या मुलांवर विदेशी संस्कृतीचा पगडा असतो. त्यातून मुलांनी जर परदेशी तरुण-तरुणीशी लग्न करण्याचे ठरविले, तर त्यात गैर काय? मात्र, समाज व संस्कृती अशा संबंधांना मान्यता देत नाही. यावर सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचा संदेश देणारा ‘आरंभ’ लघुपट जळगावातील रहिवासी असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने तयार केला आणि मेलबर्न येथील मराठी मंडळाच्या चित्रपट महोत्सवात मराठीजनांसह ऑस्ट्रेलियन्सनेही या लघुपटाला अक्षरश: डोक्‍यावर घेतले.

जळगावचे रहिवासी असलेले सुधीर पाटील ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात ‘ॲक्‍सेंचर कन्सल्टिंग’ या आयटी कंपनीत नोकरीस आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेले सुधीर हे पत्नी प्रतिभा व आपल्या दोन मुलांसह २०११ साली मेलबर्न या शहरात स्थायिक झाले. लहानपणापासून विविध कलांची आवड असल्याने सुधीर यांनी अनेक प्रकारचे शिक्षण घेतले होते. त्यातीलच फोटोग्राफीच्या छंदातून त्यांनी स्वत: निर्माता व दिग्दर्शक म्हणून काम पाहत ‘आरंभ’ हा लघुपट तयार केला. १६ मिनिटांच्या या लघुपटाचे चित्रीकरण त्यांनी नोकरी करुन पूर्ण केले. यंदा महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवात एअरलिफ्ट, पिंक, या चित्रपटांसोबत ‘आरंभ’ हा लघुपट देखील दाखविण्यात आला. 

चित्रपटाची संकल्पना अशी
हा लघुपट मराठी लोकांनी मराठी-इंग्रजी भाषेत तयार केला आहे. सोबतच सर्व कलावंतांनी आपापली कामे करुन सुटीच्या दिवशी या लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. कोणत्याही स्वरुपाचे मानधन न घेता या कलाकारांनी यात हौसेने सहभाग नोंदविला. दोन देशांमधील भिन्न संस्कृती, भिन्न समाजव्यवस्था त्यामुळे विवाहसंबंध निर्माण होताना येणाऱ्या अडचणी, हे संबंध न स्वीकारण्याची मानसिकता यावर प्रकाशझोत टाकत अशा सांस्कृतिक भिन्नतेतही दोन व्यक्तींमधील संबंध म्हणून याकडे पाहण्याचा सकारात्मक संदेश ‘आरंभ’तून देण्यात आला आहे.

मराठी मंडळाची स्थापना
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी मिळून मराठी मंडळाची स्थापन केली आहे. या मंडळात सुमारे चार हजार मराठी नागरिकांचा समावेश आहे. या मंडळाच्या माध्यमातून गणपती, नवरात्र, युवा फेस्टिव्हल, साहित्य संमेलन, दिवाळी यांसारखे उत्सव व कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

परदेशात राहूनही महाराष्ट्रीयन लोक आपली संस्कृती जपत आहे. त्यामुळे हा लघुपट तयार करताना आम्हाला खूप आनंद वाटला. लघुपट बनविताना सर्वच कलाकारांनी मेहनत घेऊन काम केले. यापुढेही अशाप्रकारचे आशयपूर्ण लघुपट बनवत राहू. 
- सुधीर पाटील (कलाकार)

Web Title: aarambh short film