Nandurbar News : केळीच्या 4 हजार झाडांची कत्तल; माथेफिरूचा प्रताप | About 4000 banana trees in farmer field were killed by unknown assailants nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

About 4000 banana trees in  farmer field were killed by unknown assailants nandurbar news

Nandurbar News : केळीच्या 4 हजार झाडांची कत्तल; माथेफिरूचा प्रताप

Nandurbar News : जिल्ह्यात केळीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मणपुरी (ता. शहादा) शिवारात सोमवारी(ता. १५ ) सायंकाळी दोघा शेतकऱ्यांचा शेतातील सुमारे चार हजार केळीच्या झाडांची अज्ञात माथेफिरूंनी कत्तल केल्याने साधारणतः शेतकऱ्यांचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तविण्यात आला आहे. (About 4000 banana trees in farmer field were killed by unknown assailants nandurbar news)

हाता तोंडाशी आलेला घास अज्ञाताने हिरावल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली असून याप्रकरणी शहादा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राह्मणपुरी शिवारातील वैशाली प्रवीण पाटील, प्रमोद प्रवीण पाटील यांच्या नऊ एकर क्षेत्रात १२ हजार तर भिका पहाडा पाटील यांच्या तीन एकर क्षेत्रात ५ हजार केळीच्या खोडांची लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेले केळीचे दोन्ही क्षेत्र जवळच आहेत. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतकरी प्रमोद पाटील हे आपल्या शेतात गेले असता अज्ञात युवक शेतात फिरत असल्याचे त्यांना दिसून आले.

या संदर्भात त्यांनी शेतात असलेल्या सालदाराला शेतात कोणी आहे का याचा तपास करण्यासाठी सांगितले होते परंतु, कोणीही दिसून आले नाही.पुन्हा दोन तासांनी शेतकरी प्रमोद पाटील हे शेतात आले असता शेतातील अडीच हजार पर्यंत केळीच्या झाडांची कत्तल केल्याचे दिसून आली.

हा प्रकार बघितल्यानंतर शेतकरी हतबल झाले. शेजारील भिका पहाड पाटील यांच्या शेतात देखील तीच परिस्थिती होती. दीड हजार पेक्षा जास्त केळीचा झाडांची कत्तल केलेली होती. शेतातून प्रमोद पाटील यांनी लागलीच गावात येऊन घडलेला प्रकार गावकऱ्यांसमोर सांगितला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रात्रीच गावकरी व शेतकऱ्यांसह प्रमोद पाटील यांनी पोलिस ठाणे गाठत शहादा पोलिसांत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना घडलेला सारा प्रकार सांगितला. अज्ञाताविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी कर्मचाऱ्यांसह संबंधित नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली.

झाडे तोडण्यासाठी कोयत्यांचा वापर

दरम्यान सायंकाळच्या सुमारास शेत शिवाराची पाहणी करून आल्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा पाहणी करायला गेलेल्या शेतकऱ्याला आपल्या शेतात घडलेले दृश्य पाहून अश्रू अनावर झाले होते. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अज्ञात माथेफिरूंनी हिरावला. शेतात केळीची तोडलेली झाडे सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेली होती. केळीचे घड तोडून फेकलेले होते. केळीचे झाडे तोडण्यासाठी कोयत्यांचा वापर केल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला आहे.

लाखोंचा खर्च वाया

दरम्यान केळी पिकाला लागवडीपासून तर फळधारणा होईपर्यंत लाखोंचा खर्च होतो. शेतकऱ्यांना पोटचा पोराप्रमाणे पिकाची काळजी घेत उत्पादन निघेपर्यंत वर्षभर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. फळधारणा झालेल्या केळीच्या बागेची अज्ञात माथेफिरूने केलेली कत्तल शेतकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली. या केळीच्या झाडांना कापण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समूह आला असावा असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

"पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या संशयितांची शोध मोहीम तत्काळ सुरू केली असून संशयितांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल."- शिवाजी बुधवंत, पोलिस निरीक्षक, शहादा

टॅग्स :NandurbarFarmerbanana