साहित्य अन्‌ आध्यात्मिक पंढरीमध्ये सुविधांची वानवा

महेंद्र महाजन
गुरुवार, 25 मे 2017

चंद्रभागेप्रमाणेच अर्धचंद्राकार वळण घेतलेली वालदेवी. तिच्या काठावर वसलेल्या साहित्य अन्‌ आध्यात्मिक पंढरीमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे. ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल यांचे गाव म्हणून विहितगाव साहित्य क्षेत्रात जसे ओळखले जाते, तसेच प्रतिपंढरपूर म्हणूनही ते ओळखले जाते. काळाराम प्रवेश सत्याग्रहावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे चरणस्पर्श झाल्याने आंबेडकरी चळवळीचे हे एक केंद्र आहे. देवळाली गावातून पुढे गेल्यावर वालदेवी ओलांडताच डॉ. आंबेडकरांसह चळवळीतील धुरिणांचे वास्तव्य असलेल्या विहितगावचा बुद्धविहार लक्ष वेधून घेतो. अशा या विहितगावाविषयी...

पालकमंत्री म्हणून कामकाज पाहत असताना माजी मंत्री बबनराव घोलप यांचा निवास विहितगाव शिवारात होता. आमदार योगेश घोलप, माजी महापौर नयना घोलप यांचा निवास आता या भागात आहे. त्याचवेळी हांडोरे, कोठुळे, हगवणे, बागूल, गांगुर्डे, शेख, पठाण ही विहितगावमधील कुटुंबे. प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात नागपंचमीला सप्ताह सुरू होऊन पालखी त्र्यंबकेश्‍वरला जाते. गावठाण आणि नव्याने विकसित झालेले सौभाग्यनगर हे दोन्ही भाग पाहिल्यावर आपसूक विकासातील दरीची कल्पना येते. या शेतकरीबहुल भागातील रहिवासी मळे भागांमध्ये विखुरलेले आहेत. कामगारांची वस्ती याठिकाणी आहे. पूर्वीच्या नाशिक रोड-देवळाली पालिकेत समाविष्ट असताना आणि त्यानंतर महापालिकेत समाविष्ट झाल्यावर नगरसेवक म्हणून दयाराम हांडोरे यांनी प्रतिनिधित्व केले. तत्कालीन नगराध्यक्ष आप्पासाहेब अरिंगळे यांच्यासमवेत त्यांनी काम पाहिले. वालदेवीच्या पाण्यावर घास, भाजीपाला, गहू, सोयाबीन, मका, भुईमूग, हरभऱ्याचे उत्पादन घेतले जायचे. झेंडू आणि गुलाबाची शेती होत होती. आता शिल्लक राहिलेल्या चाळीस एकरापर्यंतच्या जमिनीत अन्नधान्यासह भाजीपाला, कांदा, उसाचे उत्पादन घेतले जाते. पेरूची बाग आणि चिकूची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे.

गोदावरीच्या धर्तीवर वालदेवीचा विकास अपेक्षित
कोठुळे गल्ली, हांडोरे गल्ली, चिमण अळी, लिंगायत अळी, मथुरा रोड, बुडकी रोड, वालदेवीनगर, वृंदावन कॉलनी, बागूलनगर असे विहितगावचे भाग आहेत. येथील रहिवाशांना गोदावरी नदीच्या धर्तीवर वालदेवीचा विकास अपेक्षित आहे. नदीत सोडण्यात आलेल्या गटारी तातडीने बंद कराव्यात. स्थानिकांच्या माहितीनुसार पिंपळगाव खांबला मलनिस्सारण केंद्र मंजूर आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांच्या अडचणींवर प्रशासनाने तोडगा काढावा, अशीही मागणी वालदेवीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी पुढे आली आहे. शिवाय वालदेवीच्या काठाने घाट बांधून हा परिसर पर्यटनासाठी तयार व्हायला हवा, असे तरुणाईला वाटते.

रस्त्याच्या रुंदीकरणाचा आग्रह
पाथर्डी फाटा ते वडनेर गेटपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे; पण पुढे वडनेर ते विहितगावच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या रस्त्यावरील अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या रस्त्यावर चार लॉन्स असल्याने हे वर्दळीचे ठिकाण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद, वाटाघाटी करून रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्‍न निकाली निघू शकतो, असा विश्‍वास विहितगावकरांना वाटतो. त्याचवेळी वाहनांवरील वेगावर नियंत्रण आणण्यासाठी व्यवस्था करणे स्थानिकांना महत्त्वाचे आहे. त्याचवेळी सुविधांची वानवा असलेल्या जॉगिंग ट्रॅक परिसरात लग्न सोहळे करण्याबाबत पुनर्विचार व्हावा, अशी मागणी पुढे आली आहे.

उद्यान उरले नावापुरते
सर्व्हे क्रमांक १९८० मध्ये गेल्या विकास आराखड्यात भाजी मार्केट, पोलिस चौकी, दवाखान्यासाठी आरक्षण टाकण्यात आले होते; पण आता त्यावरील आरक्षण उठवण्यात आल्याचे सांगून स्थानिक शाळेच्या मागील उद्यान नावाला उरले असल्याची तक्रार करतात. याचवेळी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतातील पाणी मेन रोडपर्यंत पोचते. पावसाच्या पाण्याच्या निचरा करणे हा कळीचा मुद्दा बनला आहे.

विहितगावकरांच्या ठळक मागण्या
 विजेच्या तारा भूमिगत करण्यात याव्यात
 आरोग्य सेवेचे केंद्र असावे
 भाजी मार्केट उभारले जावे
 महाविद्यालयीन शिक्षणाची सोय व्हावी
 टपाल कार्यालय सुरू व्हावे
 व्यायामशाळेच्या जोडीलाच पोलिस चौकी असावी
 जनावरांचा दवाखाना असावा
 डासांच्या उच्छादावर प्रतिबंध करावा

मालकी हक्कातील नोंदीचा तिढा
२२१ हेक्‍टर ९७ आर क्षेत्रावर संस्थानची नोंद करण्यात आली आहे. १९७३ मध्ये सरकारच्या निर्णयानुसार ही नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार सरकारकडे पाठपुरावा करूनही हा प्रश्‍न अद्याप मिटला नसल्याने विकासाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जमिनीचा विकास करावयाचा झाल्यास नोंद असलेल्या संस्थानचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. वडिलधाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुंठ्याच्या क्षेत्रासाठी किमान पाच हजार रुपये द्यावे लागतात. हा प्रश्‍न असतानाच जमीन ९९ वर्षांच्या कराराने द्यावी लागते. त्यामुळे जमिनीच्या विकासासाठी फारसा प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाने स्थानिकांची ही झालेली अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा नोंदी प्रश्‍न निकाली काढायला हवा.
- किरण कोठुळे

महादेव मंदिराजवळील दशक्रिया विधी भागामध्ये घाट तयार करायचा आहे. जॉगिंग ट्रॅक आणि वॉल कंपाउंड उभे करायचे आहे. तसेच सौभाग्यनगर भागात एलईडी बसवायचे आहेत.
- सुनीता कोठुळे, नगरसेविका

बाबूराव बागूल यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली होती. मात्र, अद्याप स्मारकाच्या दृष्टीने हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे स्मारक तातडीने उभे राहावे. 
- शिवाजी हांडोरे, स्थानिक रहिवासी

विहितगावच्या शिवारात स्वच्छतेचा असलेला अभाव दूर व्हावा. महादेव मंदिरासमोरील भागात काँक्रिटीकरण व्हायला हवे. तसेच दशक्रिया विधीच्या पुढील भागात काँक्रिटीकरण आवश्‍यक आहे.
- अंबादास हगवणे-पाटील

स्थानिक तरुणांना इतर व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अद्ययावत व्यायामशाळेची सुविधा करावी. गावातील प्रत्येक विषयात एकमेकांचे विचार घेतले जातात. त्यातून एकोप्याचे दर्शन घडते.
- पुंजाराम कोठुळे, स्थानिक रहिवासी

महापालिकेची सातवीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी नाशिक रोडला जावे लागते. त्यामुळे शिक्षणासाठी विहितगावला प्राधान्य द्यावे. कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न सुटायला हवा. 
- विकास राजमाने, स्थानिक रहिवासी

वालदेवीला जून ते डिसेंबरपर्यंत पाणी वाहते. त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांची चार आवर्तने धरणातून सोडण्यात येतात. नदीला पाणी आल्यावर त्यावर पिके घेण्यात येतात. 
- परसराम कोठुळे, स्थानिक रहिवासी

शेती कशी राहणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकीकडे आरक्षण पडते. त्याचवेळी दुसरीकडे बंगला बांधला जातो. गाडी घेण्यासाठी शेती विकली जाते. तरुण पिढीने शेतीकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे.
- देवराम हगवणे, शेतकरी

अभ्यासिकेमध्ये सुविधा नाही. पंखे बंद आहेत. विजेसह स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांनी अभ्यासिकेकडे पाठ फिरवली आहे.
- योगेश उगले (तरुण)

Web Title: About vihitgaon

फोटो गॅलरी