दुय्यम निबंधकाला वकिलाकडून लाच घेणी पडली महागात !

दुय्यम निबंधकाला वकिलाकडून लाच घेणी पडली महागात !

शिरपूर : दस्त नोंदणी करून देण्याच्या मोबदल्यात पंटरमार्फत ३०० रुपयांची लाच स्वीकारताना येथील दुय्यम निबंधक अरुण संभाजी कापडणे (वय ५४) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने आज मुद्देमालासह ताब्यात घेतले. वकिलाकडून लाच मागणे संबंधितांना भोवले. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही संशयितांची चौकशी सुरू होती. 

येथील न्यायालयात वकिली करणारे तक्रारदार पक्षकाराच्या खरेदीखताच्या नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. त्यांचे दस्त नोंदणी करून देण्यास संबंधितांनी टाळाटाळ केली. त्याबाबत विचारणा केली असता संशयित दुय्यम निबंधक अरुण कापडणे याने ४०० रुपयांची लाच मागितली. त्याबाबत वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक शाखेशी संपर्क साधून माहिती दिली. एसीबीचे पोलिस निरीक्षक मंजितसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने येथील न्यायालयाच्या इमारतीशेजारी असलेल्या व्यापारी संकुलातील निबंधक कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. कापडणे यांचा खाजगी पंटर सुनील तथा छोटू पंडीत बाविस्कर (वय ४३, रा.वाघाडी, ता. शिरपूर) याच्याकडे लाचेपोटी तडजोडीअंती ३०० रुपये देण्याचे ठरले. रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सुनील बाविस्करला ताब्यात घेतले. पाठोपाठ कापडणे यालाही अटक करण्यात आली. येथील पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. 


संशयित कापडणे नाशिक येथील मूळ रहिवासी आहे. येथील दस्त नोंदणी कार्यालयात लाचखोरीमुळे कारवाई होण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वीही एका दुय्यम निबंधकाला सापळ्यात अडकवण्यात आले होते. शिरपुरात गाजणाऱ्या भूखंड घोटाळ्यांमध्ये या कार्यालयातील काहींचा उघड सहभाग असल्याची चर्चा असतांनाच एसीबीच्या कारवाईने तेथील लाचखोरी पुन्हा उघड झाली. लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक सुनील कुऱ्हा‍डे, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक मंजितसिंह चव्हाण, प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडिले, संदीप सरग, भूषण खलाणेकर, भूषण शेटे आदींनी ही कारवाई केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com