अपघातात पिता गमावलेल्या कुटुंबाला नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

वाहनाच्या देखभाल दुरुस्तीप्रमाणे विमा काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते. अपघातात वाहनचालकासही कमी-जास्त झाल्यास थर्डी पार्टी विम्यातून भरपाई मिळविता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने विमा काढायलाच हवा.
-ऍड. एफ. बी. सय्यद

ट्रक व्यावसायिकाने काढलेल्या विम्यामुळे कंपनीने उचलला आर्थिक बोजा

नाशिक: कार व ट्रकमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात संजय आंधळे यांचे निधन झाले होते. यानंतर त्यांच्या वारसदाराने दाखल केलेला दावा निकाली लागला असून, दाव्यापोटी तब्बल 95 लाख रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्ह्यात ही तडजोड झालेली सर्वाधिक रक्‍कम आहे. दरम्यान, या घटनेमुळे वाहन विमा किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

पानेवाडी (ता. मनमाड) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये नोकरीस असलेल्या संजय आंधळे यांचे 2014 मध्ये कारने प्रवास करत असताना ट्रकने दिलेल्या धडकेमुळे निधन झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा व आई असा परिवार होता. कुटुंबात ते एकमेव कमावते होते व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांचे वय, नोकरीची शिल्लक वर्षे यांचा अंदाज घेत त्यांच्या पत्नी संगीता आंधळे यांनी तीन कोटींचा दावा दाखल केला होता. ट्रक व्यावसायिकाने बजाज अलायन्सचा थर्ड पार्टी विमा काढलेला होता.

वारसदारातर्फे न्यायालयात ऍड. एफ. बी. सय्यद यांनी बाजू मांडली, तर विमा कंपनीतर्फे ऍड. एस. सी. अभ्यंकर यांनी काम पाहिले. तडजोडीसाठी विमा कंपनीचे महाराष्ट्रप्रमुख मुकुंद, पुष्कर जोशी, मलकंस भट यांचे सहाय्य लाभले. 2014 मधील या प्रकरणात तडजोड करण्यात आली असून, त्यापोटी वारसदारांना 95 लाख रुपये अदा करण्याचे विमा कंपनीने मान्य केले. ही जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक तडजोड रक्‍कम आहे. यापूर्वी 2014 मध्ये ऍड. सय्यद यांनीच घडविलेल्या तडजोडीत वारसदाराला 81 लाख रुपये मिळाले होते.

Web Title: Accident damage family lost a father