​नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या मालगाडीचा अपघात टळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम प्रकल्पातून निघालेली 52 डब्यांची मालगाडी, सकाळी सुमारे 10.20 वा. नांदगावच्या अलीकडे इदगाह स्थानाच्या दरम्यान 40 व्या डब्याची कपलिंग अचानक खळळ खट्याक आवाज करत तुटल्याने थांबली.

नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या 52 डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने मोठा प्रसंग ओढवला होता. नांदगाव येथे चालक बदलण्यात येत असतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. म्हणून थोडक्यात अनर्थ टळला. दीड तास दुरुस्तीला लागल्याने मालगाडीच्या मागे असलेल्या डाऊन लाईनच्या (भुसावळकडे) लांब पल्यांच्या अनेक प्रवासी गाड्या ठिकठिकाणी थांबून राहिल्या. मात्र ज्वलनशील इंधन डब्यांमध्ये असल्याने नांदगाव येथील रेल्वे कर्मचाऱ्याची चांगलीच धावपळ उडाली. 

पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम प्रकल्पातून निघालेली 52 डब्यांची मालगाडी, सकाळी सुमारे 10.20 वा. नांदगावच्या अलीकडे इदगाह स्थानाच्या दरम्यान 40 व्या डब्याची कपलिंग अचानक खळळ खट्याक आवाज करत तुटल्याने थांबली. तलाडी (जिल्हा चंद्रपूर) कडे जाणाऱ्या या मालगाडीत एचएसडी (युरो 4) (हायस्पीड डीझेल) इंधन भरलेले होते. कपलिंग तुटल्याने 40 डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गार्डच्या 12 डब्यासह उरलेले मागेच राहिले. दरम्यान ब्रेक्सची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने इंजिनला जोडलेले डब्बे व अलग झालेले डब्बे जागच्या जागी थांबून गेले. गाडी वेगात असती व डब्बे रुळावरून खाली घसरले असते तर पुढच्या अनर्थाची कल्पनाच केलेली बरी. अशी चर्चा अपघात स्थळी सुरु होती. गाडीच्या एकेका डब्यामध्ये सुमारे 65 ते 70 हजार लिटर एचएसडी (युरो 4) हे इंधन असल्याची लेबल्स लावण्यात आली होती.    

Nandgaon_1

कपलिंग तुटल्याने गाडी थांबल्याचे वृत्त नांदगाव रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर एस. जी. गोरे, एस. एन. धनवटे (लोको फोरमन) व इतर कर्मचारी मंडळी घटनास्थळी धावून गेली. सुदैवाने एक कपलिंग त्यांच्याकडे होती. ती बसवून त्यांनी डब्बे जोडले. रुळांची तपासणी केल्यानंतर दीड किमी प्रवास करून गाडी नांदगाव स्टेशनावर पोहोचली. मागे गीतांजली एक्स्प्रेस (हिसवळ), गोवा एक्स्प्रेस (पानेवाडी) व त्यामागे वास्को एक्स्प्रेस गाड्या असल्याने सदर गाडी नांदगाव येथे बाजूच्या यार्डात घेउन त्यांना पुढे जाऊ देण्याचा प्रशासनाचा विचार यार्डात आधीच तीन मालगाड्या उभ्या असल्याने बारगळला. त्यामुळे मागे असलेल्या प्रवासी गाड्याना अजून उशीर झाला. स्टेशनमध्ये मालगाडीच्या सर्व डब्यांची तपासणी करून तिला अखेर हिरवा कंदील दाखविण्यात आला. डिझेल हे ज्वलनशील इंधन असले तरी प्रसंगी त्याचा स्फोट होऊ शकतो. यामुळे नांदगाव रेल्वे स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी सुरवातीला अत्यंत तणावाखाली होते.

nandgaon_2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accident of the flammable freight train escapes at Nandgaon