ड्रायव्हर तर 'त्या' मुलींना धडक देऊन पळून गेला..पण पुढे..

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 1 डिसेंबर 2019

त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा सिग्नल बंद झाला होता. गडकरी सिग्नलकडून सीबीएसकडे जाणाऱ्या वाहनाचा सिग्नल सुटला होता. चारचाकीचालकाने घाई करत सिग्नल तोडून जाण्याचा प्रयत्न अपघातास कारणीभूत ठरला. त्यात युवती गंभीर जखमी झाली. 
 

नाशिक : त्र्यंबक सिग्नल भागात शनिवारी (ता. 30) रात्री दुचाकी आणि चारचाकी दरम्यान अपघात होऊन युवती गंभीर जखमी झाली. लिना अमित धोपावकर (वय 15, रा. वकीलवाडी) असे युवतीचे नाव आहे. धडक देऊन पळ काढलेल्या चारचाकी चालकास वाहतूक पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करत ताब्यात घेत सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. 
त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने येणाऱ्या चारचाकीने (एमएच 41, सी 5968) गडकरी सिग्नलकडून सीबीएसच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला (एमएच 15, सीवाय 9295) जोरदार धडक दिली. 

Image may contain: car and outdoor

नागरिकांनी पाठलाग करून चालकास पकडले 

नागरिकांकडून चोप देण्याच्या भीतीने चारचाकीचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सिग्नलवर नियुक्तीस असलेले वाहतूक पोलिस सुजित जाधव, तसेच नागरिकांनी चारचाकीचा पाठलाग करत त्याला अण्णा भाऊ साठे चौकात ताब्यात घेतले. नागरिक आक्रमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जाधव यांनी नागरिकांना शांत करत चारचाकीचालक सचिन आहेर (वय 25, रा. न्यायडोंगरी, नांदगाव) यास सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी लिना धोपावकर हिला रिक्षाचालकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची तब्येत गंभीर असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुचाकीस धडक दिल्यानंतर युवती खाली पडली तरी चारचाकीचालकाने न थांबवता तिच्या अंगावरून वाहन चालविल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

Image may contain: motorcycle and outdoor

अतिघाई महागात 
त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा सिग्नल बंद झाला होता. गडकरी सिग्नलकडून सीबीएसकडे जाणाऱ्या वाहनाचा सिग्नल सुटला होता. चारचाकीचालकाने घाई करत सिग्नल तोडून जाण्याचा प्रयत्न अपघातास कारणीभूत ठरला. त्यात युवती गंभीर जखमी झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident at Nashik Signal Marathi News