शहरात 77 हजार 122 मते "नोटा'ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

झालेल्या मतदानाच्या साधारण तीन टक्के; प्रभाग 23 "ड'मध्ये सर्वाधिक 1448 मते 

नाशिक - निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कुठलाही उमेदवार पसंत नसेल, तर अशावेळी "वरीलपैकी एकही नाही' अर्थात "नोटा'चा पर्याय मतदानावेळी देण्यात आला होता. कधी नव्हे ते यंदा मतदारांनी मोठ्या प्रमाणात या पर्यायाचा वापर केला आहे. प्रभाग 23 "ड'मध्ये तब्बल एक हजार 448 मते "नोटा' म्हणून नोंदविली आहेत. शहरात 77 हजार 122 जणांनी "नोटा'चा वापर केला असून, हे प्रमाण झालेल्या मतदानाच्या साधारणत: तीन टक्के आहे. 

निवडणुकीसाठी अर्ज कुणी भरावा, हा उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षाचा निर्णय असला तरी कुठला उमेदवार निवडायचा, हे मतदार ठरवितात. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पात्र नाही, असे मतदारांना वाटत असेल तर त्यांना तसे त्यांचे मत नोंदविण्याचा अधिकार "नोटा'च्या माध्यमातून मिळाला आहे. निवडणूक आयोगाला 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनंतर हा पर्याय प्रत्येक निवडणुकीत उपलब्ध करून देण्यात आला होता. 

यापूर्वी "नोटा' पर्यायाचा अत्यल्प वापर झाला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत मतदारांनी "नोटा' पर्यायाचा मोठा वापर केला आहे. प्रभागातील चार मतांपैकी ज्या जागेसाठी उमेदवार पात्र आहे, असे वाटत नसेल त्यासाठी मतदारांनी "नोटा' पर्याय निवडला आहे. ज्या जागेसाठी उमेदवारांची संख्या कमी आहे, तेथे "नोटा'चा वापर अधिक झाला आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा "नोटा' पर्याय म्हणून नोंदविलेली मते अधिक आहेत; तर हा पर्याय निवडण्यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. 

येथे "नोटा'चे प्रमाण अधिक 
प्रभाग 23 "ड'मध्ये सर्वाधिक 1448 मते, प्रभाग 20 "ब' 1320, प्रभाग 20 "क' 1352, प्रभाग 4 "ब' 1072, प्रभाग 7 "क' 1259, प्रभाग 8 "ब' 1014, प्रभाग 12 "अ' 1060, प्रभाग 17 "ब' 1105, प्रभाग 17 "क' 1202, प्रभाग 18 "ब' 1159, प्रभाग 23 "अ', "ब', "क'मध्ये 1048 व "ड'मध्ये 1448, प्रभाग 24 "अ', "ब', "क', "ड'मध्ये 1277, प्रभाग 30 "अ', "ब', "क', "ड'मध्ये 1276 मते नोंदविली आहेत. 

-बारा जागांवर एक हजाराहून अधिक "नोटा' मतांची नोंद 
-एक्केचाळीस जागांवर "नोटा' मतांची संख्या पाचशेहून कमी 
-प्रभाग 9 "ड'मध्ये सर्वांत कमी 206 मतसंख्या "नोटा' 
-"नोटा'ची मते शून्य असलेला एकही प्रभाग नाही 
-दोन, तीन उमेदवार असलेल्या जागांवर "नोटा'चा वापर अधिक

Web Title: According to the city of 77 thousand 122 nota