जळगावातील कैद्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

दोन दिवसांपासून मृतदेह औरंगाबादला पडून

दोन दिवसांपासून मृतदेह औरंगाबादला पडून
जळगाव - बोगस नियुक्तीपत्रे देत 46 बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कारागृहात असलेल्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी सुभाष भिकन मिस्तरी याचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, मंगळवारी (ता. 16) पहाटे पाचला त्याचा मृत्यू झाल्यावर जेल मॅन्युअलनुसार वेळेत कार्यवाही न झाल्याने मृतदेह दोन दिवसांपासून शवविच्छेदनाशिवाय औरंगाबादला पडून आहे. या घटनेनंतर मृताच्या नातलगांनी कारागृहाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जळगाव शहर पोलिस ठाण्यात 4 मार्च 2017 रोजी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात नोकरीला असलेल्या राजू भोजू भोई व सुभाष भिकन मिस्तरी या दोघांच्या विरोधात बोगस नियुक्तीपत्रे देऊन 46 तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सुभाष मिस्तरी याला 23 मार्चला शहर पोलिसांनी अटक केली. पोलिस कोठडी संपल्यापासून मिस्तरी न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात होता. काही दिवसांपासून कारागृहातच त्याची प्रकृती बिघडली होती.

प्रकृती गंभीर अन्‌ मृत्यू
कारागृहात प्रकृती गंभीर झाल्याने गेल्या रविवारी (ता. 14) मिस्तरी यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारानंतर मिस्तरी यास औरंगाबाद येथे सोमवारी (ता. 15) घाटी रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले. तेथे काही तासांतच 16 तारखेच्या पहाटे पाचच्या सुमारास मिस्तरीचा मृत्यू झाला. या घटनेला दोन दिवस उलटले, तरी नातेवाइकांना त्याचा मृतदेह मिळू शकलेला नाही.

बुधवारी हालचालींना वेग
मिस्तरी जळगाव कारागृहातील न्यायबंदी होता, परिणामी त्याच्या मृत्यूपश्‍चात जिल्हा कारागृहाने वेळीच कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित असताना दोन दिवसांपर्यंत कुठलीच हालचाल झाली नाही. दुसऱ्या दिवशी साडेबाराच्या सुमारास जळगाव कारागृहातील शिपाई पत्र घेऊन निघाला, तो संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास औरंगाबाद घाटी रुग्णालयात पोचला. त्यानंतर शवविच्छेदनाला सुरवात करण्यात आल्याचे मृताचा मुलगा राहुल याने सांगितले.

अधीक्षकांचा बेजबाबदारपणा
घडला प्रकार अत्यंत गंभीर असल्याने "सकाळ' प्रतिनिधीने कारागृहात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाऊण तास कारागृह अधीक्षक भेटलेच नाही. ते कामात असल्याचे सांगितल्याने सायंकाळी साडेसहाला बोलता येईल, असे सांगण्यात आले. म्हणून सायंकाळी 6.16 वाजता त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी जेल चेकिंगवर असल्याचे सांगून बोलणे टाळले. मात्र, त्यानंतर साडेसहाला अधीक्षक श्री. कुंवर यांनी स्वतः संपर्क साधत घटनाक्रम सांगितला. मात्र, दोन दिवस कैद्याचा मृतदेह औरंगाबादेत का पडून आहे, याचे उत्तर त्यांनी दिले नाही.

मिस्तरीबाबत अधीक्षकांची माहिती
12 मे : ग्रॅस्ट्राटीसचा त्रास असल्याने कारागृहातील दवाखान्यात तपासणी
13 मे : जिल्हा रुग्णालयात पाठवून उपचारानंतर परत कारागृहात आणले
14 मे : कारागृहात उलट्या होऊन पुन्हा जिल्हा रुग्णालयात रवाना
15 मे : जिल्हा रुग्णालयाने औरंगाबाद रेफर केल्याने तेथे रवाना

मृताच्या मुलाची माहिती
वडिलांना त्रास होत असल्याचे कारागृहातील कर्मचाऱ्यांमार्फत 15 मे रोजी कळवण्यात आले. सकाळी 7 वाजता वडिलांना घेऊन घाटी रुग्णालयात आलो. काहीच वेळातच डॉक्‍टरांनी ते मृत झाल्याचे आम्हाला सांगितले. नियमानुसार शवविच्छेदनासाठी मृतदेह तेथे ठेवण्यात आलेला होता. मात्र, कारागृह प्रशासनाने कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न केल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही.

Web Title: accused death in ghati hospital