
Nandurbar News : नंदुरबारमध्ये अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरूच; अतिक्रमणधारकांची वाढली धकधक
Nandurbar News : येथील पालिका प्रशासक पुलकित सिंह यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत कोणत्याही दबावाला बळी न पडता शहरातील अतिक्रमण व सुशोभीकरणाची जास्तीची जागा काढून चौक मोकळे करण्याचा धडाका लावला आहे. (Action against encroachment continues in Nandurbar news)
त्यासोबतच वर्षानुवर्षे कराची रक्कम थकविणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांवर वक्रदृष्टी करीत ती वसुलीसाठी दुकानांना सील लावण्याचा धडाका लावला आहे.
या कारवाईने अनेक भल्या मोठ्यांना धाकधूक वाढली असली, तरी सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. गुरुवारी (ता. ११) दिवसभरातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
प्रशासक पुलकित सिंह यांनी पोलिसांचा फौजफाटा सोबत ठेवत पालिका कर्मचाऱ्यांचा ताफा व जेसीबी सोबत घेऊन स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईसाठी पुढे सरसावत आहेत. त्यांच्या कारवाईच्या दंबगगिरीने साऱ्यांनाच धडकी भरली आहे.
कारण ही कारवाई कायद्याचा चौकटीत राहत शहराचा व शहरातील जनतेच्या हिताचा विचार करून केली जात आहे. त्यामुळे ज्यांचे चुकीचे आहे त्यांना त्यांची भीती वाटू लागली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गुरुवारी शहरातील जुनी पालिकेच्या मुख्य रस्त्यालगतच्या व्यापारी संकुलासमोर रस्त्यावर मंडप लावून व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण काढले. सुरवातीस त्यांना सूचना दिल्या जातात व नंतर न ऐकल्यास कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यातच राजीव गांधी कॉम्प्लेक्समध्ये काही व्यावसायिकांनी दुकानांचे भाडे व कर रक्कम न भरल्याने त्यांचे दुकान सील केले.
काही ठिकाणी वाद
मोठा मारुती मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरील पांचाळ लोकांच्या टेन्टचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर संजय टाउनहॉलसमोर श्रॉफ विद्यालयाचा भिंतीला लागून असलेले अतिक्रमणही काढण्यासाठी जेसीबी मागविण्यात आले. मात्र संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. काही वेळ वाद सुरू होता. मात्र सायंकाळ असल्याने त्याबाबतचा निर्णय उद्यावर टाकत पालिकेचा फौजफाटा निघून गेला.