सटाण्यात वीज ग्राहकांना अतिरिक्त वीजबिले

satana
satana

सटाणा - शहरातील नववसाहतीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता तासनतास विद्युत पुरवठा खंडित केला जात असून ग्राहकांकडून अतिरिक्त वीज बिलाची आकारणी केली जात आहे. नववसाहतींमधील रस्त्यांवर महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले विद्युत खांब यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना नववसाहतीतील रस्त्यांवर खरी परिस्थिती निर्दशनास आणुन देत कंपनीने याबाबत तात्काळ योग्य कार्यवाही करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलनाचा इशारा श्री. सोनवणे यांनी दिला आहे. 

याबाबत श्री. सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात, शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के नागरिक नववसाहतीत वास्त्यव्यास आहेत. गेल्या काही वर्षात मुळ शहरापेक्षा नवीन वसाहतीची वाढ चार पट झालेली आहे. मात्र वीज वितरण कंपनीने अनेक वर्षांपासून टाकलेले विद्युत तारांचे लोखंडी खांब रस्त्याच्या मधोमध असून विद्युत ताराही अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. या परिसरातील रस्त्यांवरून दररोज स्कुल बसेस व अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. बऱ्याच वेळा या वाहनांसाठी बांबुचा आधार घेऊन तारा उंच कराव्या लागतात. नागरिकांच्या घरांवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे यापूर्वी काही अनुचित प्रकार घडले आहेत. मात्र तरीही वीज वितरण कंपनी यातून कोणताही धडा घेत नाही. नववसाहतीत सर्वच ग्राहकांनी वर्षभरापूर्वी डिजिटल मीटर बसविलेले असताना कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना नवीन मीटर बसविण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय केला जात आहे. 

तसेच गेल्या काही महिन्यांपासून वीज ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल दिले जात आहे. वीज बिलांमध्ये वीज आकार व्यतिरीक्त स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, विज शुल्क, विज विक्री कर या गोंडस नावाखाली वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची सर्रास लुटमार केली जात आहे. त्यातच महावितरण कडून रात्री - अपरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा तासनतास खंडीत केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य वीजग्राहक, व्यापारी, रुग्णालयातील रुग्ण, वैद्यकीय व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणने तातडीने योग्य ती कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे. यानंतर श्री. सोनवणे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल ऊईके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. टी. पवार, उपकार्यकारी अभियंता अे. आर. आहिरे, शहर अभियंता तुषार कापसे, एम. बी. सुर्यवंशी यांना नववसाहतीत पाचारण करून रस्त्यावरील खरी परिस्थिती निदर्शनास आणून दिली. श्री. उईके यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहेत. यावेळी प्रविण बधान, बाळासाहेब शेवाळे, सुनिल बिनायक्या, विलास गोसावी, संदिप भामरे, जयवंत रौंदळ आदी नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com