ही जनयात्रा मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही- आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

ही आशीर्वाद जन यात्रा आहे मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे आणि तेव्हा आपण निवडणूका जिंकणारच आहोत, असे आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

धुळे : ही आशीर्वाद जन यात्रा आहे मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे आणि तेव्हा आपण निवडणूका जिंकणारच आहोत, असे आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

ठाकरे पुढे म्हणाले की, गेली पाच वर्ष पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आंदोलने केली रस्त्यावरती उतरलो सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडवले. खासदारकीचा निवडणुकांमध्ये जे प्रेम मतदारांनी शिवसेनेवर दाखवले आहे  म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी मी आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

ज्यांना शिवसेना कळलेली नाही त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केले त्यांची मनं जिंकण्यासाठी ही जन यात्रा काढली आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही जन यात्रा आहे. जन आशीर्वाद यात्रा जरी नाव असले तरी माझ्यासाठी ही तीर्थयात्रा आहे. 

माझे आजोबा आणि माझे वडील यांची मला शिकवण आहे की, जनता जनार्दनाचे आशीर्वाद हे नेहमी आपल्या सोबत असायला हवेत. 2012 पासून मी दुष्काळ दौरा करत आहे पण मागच्या वर्षीचा दुष्काळ हा जरा वेगळा होता. दुष्काळी दौरा करत असताना फोटो काढणे महत्त्वाचे नसते तर लोकांच्या अडचणी समजून त्या दूर करणे हे महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते ते करत आलेलो आहे आणि यापुढेही करतच राहणार आहोत हे वचन देण्यासाठी मी इथे आलेलो असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

तुमच्या मनात काय आहे तुमच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सुद्धा या  यात्रेचे आयोजन केलेले आहे. आपण कर्जमुक्ती करणार आहोत कर्ज माफी नाही कारण माफी ही गुन्हेगारांना केली जाते. आंदोलन आणि निवेदन या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपल्याला कर्जमुक्ती करायची आहे. "पंतप्रधान पिक विमा योजना" याचे पैसे लोकांना मिळालेले नाहीत आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांवर अति काढलेला तो मोर्चा होता. मुंबईत असताना तुमच्यासाठी हा मोर्चा काढणे हे आमचे कर्तव्य असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, दिल्ली-मुंबई रस्त्याचे काम सुरू होणार आहे आणि इथल्या भूमिपुत्रांना नोकरी मिळावी हे देखील आग्रहाची विनंती असणार आहे. आरोग्यमंत्री माझ्यासोबत आहेत थोड्या दिवसात तुम्हाला बातमी मिळेल की तुमच्या इथे रुग्णालय सुरू झाली आहे आणि आरोग्य सेवा सुधारली आहे त्याचे मी तुम्हाला आज वचन देतो असेही ते म्हणाले. 

हेच शिवसेनेचे काम आहे. गेली वीस वर्षे काही कामे अपूर्ण आहेत त्यांची निवेदने मी घेऊन कामे मार्गी लावणार आहे. नवीन महाराष्ट्र जो प्रदूषण मुक्त महाराष्ट्र, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी माझ्यासोबत महिला, शेतकरी मला आशीर्वाद देऊन माझ्यासोबत तुम्ही येणार का ? असेही त्यांनी यावेळी विचारले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackreays Janyatra Rally in Dhule