न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चरविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नाशिक - जादा व्याजदराचे आमिष दाखवून येथील दांपत्यास 12 लाखांचा गंडा घालणाऱ्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चरचे अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

नाशिक - जादा व्याजदराचे आमिष दाखवून येथील दांपत्यास 12 लाखांचा गंडा घालणाऱ्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चरचे अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

शशांक बाळकृष्ण कुलकर्णी व सीमा शशांक कुलकर्णी यांनी पुण्याच्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चरचे अध्यक्ष विनय प्रभाकर फडणीस, शरयू विनायक ठकार, भाग्यश्री सचिन गुरव, सायली विनय फडणीस आणि अनुराधा विनय फडणीस यांच्या शब्दावर विश्‍वास ठेवत 12 लाखांची गुंतवणूक केली. मुदत संपल्याने कुलकर्णी यांनी फडणीस ग्रुपकडे पाठपुरावा केला असता व्याज व गुंतवणुकीची रोकड मिळाली नाही. कुलकर्णींबरोबरच शेकडो गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी फडणीस कंपनीचे अध्यक्ष व संचालक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर संशयितांनी नोव्हेंबर 2015 अखेर सर्व पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीविरोधात तक्रारी दाखल केल्या नाहीत. परंतु, मुदत संपूनही गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले नाहीत आणि पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने कुलकर्णी दांपत्याने या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना स्वतंत्र गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. यापूर्वीही मुंबई नाका पोलिस ठाण्यात या कंपनीविरोधात दोन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: After the court order filed against Phadnis Infrastructure