अभियंता होऊन "ती' चालवतेय चहाकट्टा 

सागर आहेर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

चांदोरी : चिंचोली येथील सर विश्‍वेश्‍वरय्या इन्स्टिट्यूटमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरी की व्यवसाय, हा प्रश्‍न रूपाली शिंदेसमोर होता. पिंपळगाव बसवंत येथील रचना केमिकलमध्ये एक वर्ष नोकरी करून समाधान झाले नाही. पुन्हा गावी शिंगवे येथे येऊन व्यावसायिक ब्यूटिपार्लर टाकण्याचा विचार मनात आला. परंतु भांडवल, त्यातील उत्पन्न याचा विचार करता चहाची टपरी सुरू करण्याचा विचार मनात आला नि सायखेडा येथे बासुंदी व तंदुरी चहा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला. आज तिचा चहाकट्टा पूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. 

रूपालीने आई-वडील व भावाला ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी तिच्यामागे ठामपणे उभे राहून पाठिंबा दिला. शिंगव्याचे उपसरपंच धोंडिराम रायते यांची भेट घेतली असता त्यांनी आपली मोक्‍याच्या ठिकाणी असलेली जागा तत्पररीत्या उपलब्ध करून दिली. यातून कुठेतरी रूपालीचे स्वप्न पूर्णत्वास येण्यास सुरवात झाली. नोकरीतील अनुभव पाठीशी होता. यामुळे व्यवसाय करण्याचे तिने नक्की केले. चहाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरल्यानंतर चहाच्या गुणवत्तेसाठी इंजिनिअरिंगच्या अनुभवाचा उपयोग झाला.

सायखेड्यातील ग्राहकांना बासुंदी व तंदुरी चहा येथे तिने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद सुरवातीपासून मिळाला. एक युवती त्यातही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले असल्याने साहजिकच सर्वांनी तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला, तर माजी शिक्षक, नागरिकांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक केले. याच व्यवसाय विस्तारासह साधारणतः तीन ते चार किलोमीटरपर्यंत पार्सल सुविधा देण्याचा आशावाद रूपालीने बोलून दाखविला. 

कुठलाही व्यवसाय करणे कमीपणाचे नाही. शिक्षणाचा उपयोग करून ग्राहकांना नावीन्यपूर्ण देऊ शकते. 
- रूपाली शिंदे 

रूपालीने पदवी घेऊन चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय कौतुकास्पद वाटला, इतरांनीही यातून प्रेरणा घ्यावी. 
धोंडिराम रायते, उपसरपंच, शिंगवे 

Web Title: after engineering she starts business of tea