सैन्यदलातील निवृत्तीनंतर शेतातील सेकंड इनिंगने साधला विकासाचा मार्ग

खंडू मोरे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सैन्य दलातून निवृत्तीनंतर वर्षभरात खडकाळ माळरानावर हिरव सोनं पिकवण्याची किमया बळवंत आहेर यांनी साधली आहे.

खामखेडा (नाशिक) - चाचेर ता कळवण येथील निवृत्त माजी माजी सैनिक बळवंत तानाजी आहेर यांनी सैन्य दलातून निवृत्तीनंतर काळ्या आईची सेवा करत खडकाळ माळरान पिकवायची खुणगाठ बांधली अन् वर्षभरात खडकाळ माळरानावर हिरव सोनं पिकवण्याची किमया साधली आहे. पारंपारिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करून आधुनिकतेची कास धरत मिरची पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले आहे.

खामखेडा येथील बळवंत तानाजी आहेर हे भारतीय सैन्यात सैनिक होते. एकोणवीस वर्ष्याच्या सेवेनंतर नुकतेच निवृत्त झालेत. अनेकजण सैन्य सेवेतून निवृत्त झाल्यावर दुसऱ्या नोकरीच्या शोधात असतात मात्र आहेर यांनी काळ्या आईची सेवेसाठी पुढे होत शेती करण्याचे ठरवले.

एक भाऊ सैन्यदलात असल्याने व वडिलांची इच्छा असल्याने बळवंत देखील सैन्यात दाखल झालेत. 19 वर्ष सैन्यात नोकरी केल्यानंतर ते वर्षभरापूर्वी निवृत्त झालेत. देशाचे रक्षण करीत असतांना त्यांना कळवण तालुक्यातील चाचेर या गावी साडेचार एकर क्षेत्र इनाम म्हणून मिळाले. अन सैन्यातील नोकरीनंतर आपण देखील शेती करायची असे त्यांनी मनाशी ठरवले.

शासनाकडून सैनिकांच्या कल्याण निधीतून जमीन मिळाल्यामुळे सेवा निवृत्तनंतर दुसरीकडे नोकरी न करता त्यांनी प्रायोगिक शेती करण्याचे ठरविले. सुरवातीला त्यांनी रासायनिक खते वापरून शेती केली. परंतु अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि सेंद्रिय शेतीची माहिती मिळविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

प्रयोगशील शेतकऱ्याकडून शेतातील प्रयोग, गांडूळ खताविषय माहिती मिळाली. हे खत शेतीसाठी कितपत फायदेशीर ठरते. याविषयी माहिती घेतली. आपल्या शेतात सेंद्रिय गांडूळ खत टाकून मल्चिंग पेपरवर मिरची पिकाची लागवड केली.

सैनिक बळवंत आहेरांनी कष्टातून उभ्या केलेल्या खडकाळ माळरानावरील मिरची पिक जोमात आहे. दररोज पन्नास पाउच (एका पाउचचे वजन वीस किलो असते) निघतात. या खडकाळ माळराणावरील मिरचीचे पीक परिसरात चर्चेचा विषय ठरल्याने अनेक शेतकरी मिरचीचे पीक पाहण्यासाठी येत आहेत.

एकोणवीस वर्षांच्या सैनिकी कारकीर्दीत भारतभर भ्रमंती केली. सैनिकी गुण अंगी बाणले असल्याने शेतीत देखील नीटनेटकेपणा त्यांच्या या हिरव्या माळरानावर पाहिल्यावर नजरेत भरतो.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: After Military retirement Balvant Aher is Successfully doing farming