
Sakal Impact : बिबट्याची दहशत; अखेर वन विभागाची दिघाव्यात धाव
म्हसदी (जि. धुळे) : दिघावे (ता. साक्री) येथील कामद शिवारातील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेची विशेषतः शेतकरी व शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी (Farmer) धास्ती घेतली आहे. (after news published in sakal news paper about leopard Pimpalner Forest Department employees visited injured farmer dhule news)
गुरुवारी (ता. २) सकाळी ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत पिंपळनेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी शेतकऱ्याची भेट घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
बिबट्याच्या बंदोबस्तासह बिबट्यापासून सतर्क राहून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले. तथापि, बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतशिवारात जाणे ‘जीव’ झाडाला टांगण्यासारखी परिस्थिती असल्याची रडकथा ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांपुढे मांडली केली.
अधिकारी, कर्मचाऱ्यांची धाव
दिघावे येथील शेतकऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. गुरुवारी (ता. १) ‘सकाळ’मध्ये ‘दिघाव्यात हल्लेखोर बिबट्याची दहशत कायम’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. शिवाय वन विभागावरही ग्रामस्थांचा रोष असणे स्वाभाविक आहे.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विवेक अहिरराव यांच्याशी निवासस्थानी चर्चा करताना पिंपळनेर वन विभागाचे वन कर्मचारी
सकाळी सहाय्यक वनसंरक्षक एस. व्ही. पाटील, उपवनसंरक्षक नितीशकुमार सिंग, वनसंरक्षक डी. बी. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी. आर. अडकिने, वनपाल एस. पी. मंडलिक (दिघावे), पश्चिम घाट वनक्षेत्राचे वनपाल बी. पी. वाघ, वनपाल एस. व्ही. पाटील (डांगशिरवाडे), वनरक्षक टी. एल. गादेचव्हाण (दिघावे), दीपाली बडगुजर (विरखेल) आदींनी जखमी शेतकरी विवेक अहिरराव यांची भेट घेत विचारपूस केली.
शेतकरी, ग्रामस्थांची ‘रड’ मात्र रडारवरच!
बिबट्या असो वा पट्टेरी वाघ मात्र वन्यपशूंच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे नकोसे झाले आहे. शेतशिवारात बिबट्याने गुरुवारी सकाळी तरुण शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले. तरुण शेतकरी विवेक अहिरराव यांच्यावर हल्ला झालेल्या घटनेनंतर कामद शिवारात शेतमजूरही येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा अधिवास शोधत पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी नितीन अहिरराव, विश्वास अहिरराव, अरुण अहिरराव, भाऊसाहेब अहिरराव, सागर अहिरराव, मनोज अहिरे, राजेंद्र सोनवणे, संजय अहिरे, छगनलाल पाटील आदींनी वनकर्मचाऱ्यांकडे लावून धरली.
शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी
वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात वन्यपशू बिबट्याचा नेहमी वावर असल्याचे वन विभागानेही मान्य केले आहे. या संदर्भात वनक्षेत्रपाल अडकिने यांनी शेतकऱ्यांनी सतत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले.
ज्या भागात बिबट्याचा नित्य वावर असेल अशा ठिकाणी एकट्यादुकट्या शेतकऱ्याने कामाशिवाय जाऊ नये, शक्य असल्यास उभे राहून काम करावे, अशा सूचना दिल्या. या भागातील वनक्षेत्रात केवळ बिबट्यासारख्या वन्यपशूचा वावर असला तरी अजून पट्टेरी वाघसदृश वन्यप्राणी नसल्याचा खुलासाही श्री. अडकिने यांनी केला.
"वनक्षेत्रालगत शेतशिवारात बिबट्याचा हमखास वावर आहे. अशा ठिकाणी बिबट्यास पांगविण्यासाठी फटाके वाजवून वा मिरचीचा धूर करावा. शेतात काम करताना जमिनीवर बसू नये." -डी. आर. अडकिने, वनक्षेत्रपाल, पिंपळनेर, वन विभाग