तुकाराम मुंढे : वर्षाच्या आतच उचलबांगडी होणारा अधिकारी!

After Pune, Tukaram Mundhe transferred from Nashik within nine months
After Pune, Tukaram Mundhe transferred from Nashik within nine months

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेचा कारभार रुळावर येईल अशी शहरवासीयांना आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची फेब्रुवारीत नियुक्ती झाल्यावर वाटले होते. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याचा सूर काही केल्या जुळला नाही अन् आज अखेर मुंढे यांच्या बदलीचा आदेश धडकला.

नाशिकमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी मुंढे यांच्याकडे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या 'पीएमपीएमएल'ची जबाबदारी होती. विशेष म्हणजे, त्यांची पुण्यातील कारकिर्दही केवळ नऊच महिने टिकली. नियुक्तीनंतर नऊ महिन्यांमध्येच त्यांना नाशिकला पाठविण्यात आले.

मुंढे यांची मंत्रालयात नियोजन सहसचिव पदी बदली झाली. पण त्यांचा उत्तराधिकारी शासनाला ठरवता आला नाही; परिणामी बदली आदेशात मुंढे यांना नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचे सांगावे लागले. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि नाशिकचे जावई राधाकृष्ण गमे यांचे नाव मुंढे यांचे उत्तराधिकारी म्हणून जोरदार चर्चेत आले; मात्र सध्या तरी ती चर्चा राहिली.

दुसरीकडे मुंढे यांच्याकडे नाशिक जिल्हाधिकारी पद सोपविले जाईल, अशी अटकळ होती; पण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांनी फारशी अनुकुलता दर्शविलेली दिसत नाही. त्यामुळे 9 महिने 13 दिवसात मुंढे यांना शिस्तीच्या नावाखालील कारभारामुळे नाशिक सोडून मुंबईचा मार्ग शासनाने दाखविला

वेगवान घडामोडी
नाशिक हे थंड हवेचे तसे चळवळीचे केंद्र म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्याची चुणूक मुंढे यांच्या बदलीच्या अनुषंगाने दिसून आली. ऑगस्टमध्ये सत्ताधारी भाजपने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला असताना नाशिककरांनी महापालिका आवारात जाऊन जोरदार समर्थन केले.

आज सकाळपासून महापालिका कार्यालयासमोर समर्थक जमले आणि निदर्शने सुरू केली. शासनाविरुद्ध घोषणाबाजीने परिसर दुमदुमून सोडला. मुंढे हेही बदलीचा आदेश नसल्याचे स्पष्ट करत कामावर हजर झाले. उत्साही समर्थकांनी महापालिका कार्यालयात प्रवेश केला, त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. इतक्यात शासनाचा बदलीचा आदेश धडकला आणि मुंढे यांनी कार्यालय सोडले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

भाजप ने फोडले फटाके
मुंढे यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाचे ठरावात मुख्यमंत्र्यांच्या विरोधामुळे रूपांतर होऊ शकले नाही. त्यात आज पुन्हा निषेधाच्या सुरामुळे जखमेवर मीठ चोळल्याची भावना भाजपमध्ये तयार झाली. या साऱ्या धगीला मात्र मुंढे यांच्या बदलीच्या आदेशानंतर वाट मोकळी करून देण्यात आली. भाजप समर्थकांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण निवासस्थान समोर फटाके फोडले आणि जल्लोष केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com