शिरपूरला अग्रवाल हॉस्पिटलची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाइकांचा आरोप
शिरपूर - प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने आज सकाळी येथील अग्रवाल हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाइकांचा आरोप
शिरपूर - प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने आज सकाळी येथील अग्रवाल हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

शहरातील वाल्मीकनगरमधील दीपाली उदय ढोले (वय २७) या प्रसूतीसाठी तहसील कार्यालयामागे असलेल्या डॉ. भटू अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. आज पहाटे पाचच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला. नंतर दोन तासांनी तिचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच दीपालीच्या सासर व माहेरचे नातेवाईक हॉस्पिटलच्या परिसरात जमले. तिच्या माहेरील महिलांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे परिसरात जमाव एकत्र झाला. तिच्या मृत्यूस डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने डॉ. अग्रवाल यांच्या केबिनच्या काचा, खुर्च्या, खिडक्‍यांची तावदाने यांची मोडतोड केली. रिसेप्शन काउंटरवरील टेलिफोन, फाइल, गेटजवळ झाडांच्या कुंड्या फेकून देण्यात आल्या. 

या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय पवार, सहाय्यक निरीक्षक अकबर पटेल, उपनिरीक्षक विजय आटोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला. मात्र, हॉस्पिटलपासून काही अंतरावर जमाव थांबून होता. दरम्यान, शहरातील अन्य रुग्णालयांचे डॉक्‍टरही तेथे पोहोचले.

त्यांनी मृत महिलेचे नातलग आणि जमावाची समजूत काढली. मृतदेह रुग्णवाहिकेतून धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत शिरपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. हॉस्पिटलमधील तोडफोडीबाबत डॉ. अग्रवाल यांनी फिर्याद न दिल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दीपालीच्या शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी सांगितले.

यापूर्वीही तोडफोड
सुमारे चार वर्षांपूर्वी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये ॲपेंडिक्‍सच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही संतप्त जमावाने तेथे तोडफोड केली होती. मृत दीपालीचे माहेर जळगाव येथील गेंदालाल मिल परिसरात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: agarwal hospital damage