शिरपूर : अपघातानंतर महामार्गावर रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

शिरपूर : अपघातानंतर महामार्गावर रास्ता रोको

शिरपूर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी (ता. शिरपूर) जवळ अपघातांची मालिका बुधवारी (ता. २२) देखील सुरु राहिली. सकाळी रस्ता ओलांडताना कंटेनरने धडक देऊन झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केला. तासभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. महामार्गावर तातडीने गतिरोधक टाकल्यानंतर ग्रामस्थ घरी परतले.

सांगवी गावाकडून महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना पठाण जमरे (वय ४५, रा. वडगाव जि.बडवानी, मध्यप्रदेश) याला कंटेनरने धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थ महामार्गावर जमले. त्यांनी महामार्गाच्या दुतर्फा रास्ता रोको करुन वाहतूक रोखून धरली. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट घटनास्थळी पोचले. त्यांनी समजूत घातल्यानंतर एका बाजूची वाहतूक ग्रामस्थांनी खुली केली. महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला असून मोठे गतिरोधक टाकल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी धुळे-पळासनेर टोलवे लि. च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. काही वेळानंतर कंपनीतर्फे साहित्याने भरलेली वाहने महामार्गावर दाखल झाली. गतिरोधक टाकल्यानंतर जमाव गावात परतला.

हेही वाचा: नवापूर अतिक्रमण काढणार आश्वासन मिळाले नंतर उपोषण मागे

तीन दिवसांत चार ठार

महामार्गावर सांगवी गावालगत अपघातांची मालिका सुरु असून, तीन दिवसांत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. १८ जूनला सायंकाळी बोराडीकडे जातांना दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने शांतिलाल जिन्या पावरा (वय २२) व शंभू तेरसिंह पावरा (वय ५३) ठार झाले होते. १९ जूनला सायंकाळी जाणाऱ्या राजा भगवान कोळी (वय २२) याला टेम्पोने धडक दिली होती. त्यात कोळी ठार तर त्याचा मित्र धर्मेंद्र पावरा गंभीर जखमी झाला. पाठोपाठ बुधवारी सकाळी पठाण जमरे कंटेनरच्या धडकेत ठार झाला. अपघातातील बळींमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना पसरली होती.

हेही वाचा: कळंबू परिसरात पावसाची हुलकावणी; बळीराजा चिंतातूर

Web Title: Agitation On The Highway After The Accident At Shirpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top