सटाण्यात डबक्यात नागरिकांचे गांधीगिरी आंदोलन

Satana
Satana

सटाणा  : शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या नववसाहतींमधील रस्त्यांवर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वसाहतीला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम व स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या मोठ्या डबक्यात पोहत पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला. आंदोलनस्थळी आलेल्या नगरसेवक महेश देवरे यांना संतप्त नागरिकांनी धारेवर धरले. प्रभागातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती न केल्यास पालिका कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही नागरिकांनी दिला.

पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर घालणारे नववसाहतीतील प्रामाणिक नागरिक विकासकामांपासून वंचितच आहेत. गेल्या दीड वर्षांपूर्वी पालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली, मात्र निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार या प्रभागातील रस्त्यांची कामे झालेली नसून आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सन्मित्र हौसिंग सोसायटी, क्रांती नगर, डी. एम. देवरे मार्ग, अभिमन्यू नगर, शिक्षक कॉलनी, प्रगती शाळा या परिसरातील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून वाताहत झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. विद्यार्थी व नागरिकांना पायी चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून दुचाकीधारकांची मोठी तारांबळ उडते.  

चिखलमय रस्त्यावर डुकरांनी देखील उच्छाद मांडला असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांना वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

या एकूणच परिस्थितीला कंटाळलेल्या स्थानिक नागरिक व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी रस्त्यावर तयार झालेल्या पावसाच्या डबक्यात तीन तास उभे राहून गांधीगिरी आंदोलन छेडले. श्री. कदम यांनी तर चक्क जलतरण तलावाच्या स्वरूपातील डबक्यात पोहत पालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. दरम्यान, नागरिकांनी नगराध्यक्ष सुनील मोरे व नगरसेवक महेश देवरे यांना फोनवरून आंदोलनाबाबत माहिती दिली. नगरसेवक महेश देवरे हे आंदोलनस्थळी उशिरा पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या समोर तक्रारीचा पाढा वाचून पालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे धिंडवडे काढले. व निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले याचा जाब विचारला. नगरसेवक देवरे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात शमा दंडगव्हाळ, व्ही. डी. काकुळते, संजय देसले, रोहित शिंदे, महेंद्र कुवर, मनोज पाटील, मुरलीधर अहिरे, मीना सोनवणे, सुरेखा देवरे, जोत्स्ना गोविल, सुनंदा देवरे, संगीता खैरनार, छाया अहिरे, विजय भामरे, साहेबराव सावळा, चंद्रकांत सोनवणे, संजय शेवाळे, रामदास सोनवणे, नानासाहेब पवार, धनाजी निकम, पांढरीनाथ वाघ, समाधान खरे, सुहास सोनवणे, भगवान बर्डे आदींसह परिसरातील नागरिक सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com