भाव पाडून सरकारकडून शेतकऱ्यांचे खून

येवला - शेतकरी मेळाव्यात सोमवारी बोलताना आमदार बच्चू कडू. समोर मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी.
येवला - शेतकरी मेळाव्यात सोमवारी बोलताना आमदार बच्चू कडू. समोर मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी.

येवला - शासनाच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, इथे कांदा पिकत असताना सरकारने ५० हजार टन कांदा आयात केला. यामुळेच भाव पडल्याने निराशाग्रस्त शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने केलेले हे खून आहेत, असा घणाघात आमदार बच्चू कडू यांनी केला. सरकारला त्यांची चूक दाखवून प्रश्‍न सोडविण्यासाठी २४ फेब्रुवारीला नाशिकमध्ये राज्यव्यापी कांदा परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

प्रहार शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. २८) दुपारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य शेतकरी मेळावा झाला. या वेळी आमदार कडू आले होते. या मेळाव्यास तालुक्‍यातून मोठ्या संख्येने शेतकरी आल्याने संपूर्ण सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. या वेळी महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कांदा जीवनावश्‍यक कसा, असा सवाल करून शेतकरी नेते शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असतानाही कांदा जीवनावश्‍यक यादीतच होता. सरकारचे धोरण पाहिले की छत्रपतींची तलवार काढावी अन्‌ अफजल खानाऐवजी या सरकारचा कोथळा बाहेर काढावा, असे वाटत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या मुलाबाळांपेक्षा पिकांना अधिक जपणाऱ्या पिकांचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. याचमुळे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तरीही सगळे शांत कसे? १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती तात्या टोपेंच्या गावात ही स्थिती का, असा सवाल करून २४ फेब्रुवारीला नाशिकला शेतकरी प्रश्‍नासाठी शेतकरी अधिवेशन घेण्यात येणार आहे. चांदवडच्या आंदोलनात राज्य सरकारने कांद्याला २०० रुपये अनुदान आम्ही देतो. ३०० रुपये केंद्र सरकारने द्यावे, यासाठी प्रस्ताव तयार करतो, असे लेखी आश्‍वासन दिले होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी असे आश्‍वासन मला दिले होते पण अजूनही या सरकारला केंद्राकडे अनुदानाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची माहिती कडू यांनी दिली. सूत्रसंचालन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले. प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, अनिल भडांगे, दत्तू बोडखे, कृष्णा जाधव, वसंतराव झांबरे, सचिन मढवई, रंगनाथ जाधव, मनोहर मखरे, विठ्ठल पवार,  सचिन मढवई, अरुण आहेर, बाळासाहेब शिंदे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी तिजोरीत पैसे नाही म्हणता अन्‌ मतावर डोळा ठेवून सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, आमदारांचा पगार वाढवता, तेव्हा यांना लाज वाटली नाही का, असा प्रश्‍न करत भाजपवाले रामभक्त नाहीत, तर रावणभक्त आहेत.
- आमदार बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com