प्रयोगशील बागायतदारांसाठी नाशिकमध्ये फलोत्पादनाची पर्वणी

नाशिक - सकाळ-ऍग्रोवन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आयोजित दुसऱ्या राष्ट्रिय फलोत्पादन परिषद व प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन गुरुवारी सज्ज झालेला विद्यापीठ परिसर.
नाशिक - सकाळ-ऍग्रोवन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आयोजित दुसऱ्या राष्ट्रिय फलोत्पादन परिषद व प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन गुरुवारी सज्ज झालेला विद्यापीठ परिसर.

नाशिक - फळपिके, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला अन्‌ पुष्पोत्पादनातील प्रयोगशील बागायतदारांसाठी नाशिकमध्ये फलोत्पादनाची पर्वणी होत आहे. "सकाळ-ऍग्रोवन' आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे होत असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेतंर्गतच्या कृषी तंत्रज्ञान महोत्सव प्रदर्शनाचे उद्‌घाटन उद्या (ता. 4) सायंकाळी चारला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होईल. खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहतील. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ-तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणाऱ्या परिषदेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 5) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

गंगापूर-गोवर्धन शिवारातील मुक्त विद्यापीठाच्या मैदानावर होत असलेल्या परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन असतील. कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रमुख पाहुणे असतील. परिषदेच्या निमित्ताने गडकरी हे नाशिकमध्ये येत असताना त्यांच्या हस्ते चिल्ड्रन ट्राफिक एज्युकेशन पार्कच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन आणि नाशिकच्या वाहतुकीतील महत्त्वाच्या उड्डाण पुलावरील तांत्रिक दोष दूर करणाऱ्या अकराहून अधिक कामांचे भूमिपूजन होईल. परिषदेचा समारोप सोहळा रविवारी (ता. 6) सायंकाळी होईल.

शेतकरी निघणार नाशिककडे
मुक्त विद्यापीठाच्या मैदानावर परिषदेतील विचारमंथनासाठी डोमची उभारणी करण्यात आली आहे. या डोमच्या शेजारी निमंत्रित शेतकऱ्यांच्या भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानालगत असलेल्या विद्यापीठाच्या हॉलमध्ये भरणाऱ्या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या, संस्थांनी स्टॉलची उभारणी सुरू केली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या (ता. 4) राज्यभरातील निमंत्रित शेतकरी नाशिककडे रवाना होतील. नाशिकमध्ये या शेतकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुक्काम ते परिषदेच्या स्थळापर्यंत वाहनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय कृषी प्रक्रिया उद्योगांना रविवारी (ता. 6) सकाळी शेतकऱ्यांना भेट देता येणार आहे.

निमंत्रित शेतकऱ्यांना प्रवेश
परिषदेसाठी राज्यभरातील बाराशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना नाशिकमधील मुक्काम व्यवस्थेबद्दलची माहिती एसएमएसद्वारे कळवण्यात आली आहे. याखेरीज परिषदेच्या निमित्ताने भरवण्यात आलेले प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे. कृषी विभागाने प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची व्यवस्था केली आहे.

'मराठवाड्यात केसर आंब्यासाठी पोषक वातावरण असल्याने इथल्या आंबाला चांगली मागणी असते. मराठवाडा हा केसर झोन म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत दुष्काळासह अनेक संकटांचा सामना आंबा उत्पादकांना करावा लागतो आहे. नाशिकमधील परिषदेमध्ये यासंबंधाने मांडणी केली जाणार आहे. औरंगाबादमध्ये केशर आंबा निर्यात केंद्र सुरू करावे, फळांच्या निर्यातीसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करावी, रेल्वे गाड्यांद्वारे फळांच्या वाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था असावी, फ्रेश मार्केटिंग झोन तयार केले पाहिजेत आदींचा समावेश असेल.''
- सुरेंद्र भंडारी (अध्यक्ष, केशर आंबा उत्पादक संघ, औरंगाबाद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com