गिरीश महाजन बारामतीत याच.. बघतो तुम्हाला! 

Ajit Pawar dares Girish Mahajan to contest from Baramati
Ajit Pawar dares Girish Mahajan to contest from Baramati

जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पैशाच्या बळावर जनतेला विकत घेण्याची भाषा करीत आहे, बारामतीत जाऊन त्या ठिकाणीही आपण विजयी मिळवू, अशी त्यांनी वल्गना केली आहे. त्यांनी यावेच.. आपणही बघतोच..! असे आव्हान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून, मंत्रिपद मिळाले म्हणून शिंगे फुटत नाहीत. त्यांनी अशी गर्वाची भाषा करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. "राष्ट्रवादी'च्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित जळगावातील जाहीर सभेत ते बोलत होते. 

रायगड येथून सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची "निर्धार परिवर्तन' यात्रा आज जळगाव जिल्ह्यात पोहोचली. रिंगरोडवरील मणियार मैदानावर सायंकाळी सभा झाली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे- पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, फौजिया खान, जयदेव गायकवाड, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, ईश्‍वर बाळबुधे, अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सध्या गर्वाची भाषा करीत आहेत. राज्यातील महापालिका पैशाच्या बळावर विकत घेतल्यानंतर ते बारामतीत विजय मिळवू, अशा वल्गना करीत आहेत. त्यांनी बारामती विकत घेण्याची भाषा करू नये, गेली पन्नास वर्षे तेथील जनता मला आणि माझ्या काकांना निवडून देत आहेत. हे कुठलं आलं आहे सोपाटन, त्यांनी बारामतीला यावेच! आपणही त्यांना बघतो. त्यांच्याकडे अशी भाषा कुठून येते हे समजत नाही. ही जनता आहे, जसे वर चढविते तसे खालीही खेचते. त्यामुळे ही गर्वाची भाषा बरी नाही. मी--मी म्हणणारे टिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी जरा दमानं घ्यावं, असा सल्लाही त्यांनी दिला. 

केंद्र व राज्य सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली. सरकार मोदी सरकार केवळ चुनावी जुमले करीत आहे. शेतकरी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यांना आता कोणीही वाली नाही. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर बंदी आणि डान्सबार सुरू असा अजब प्रकार आहे. डान्सबार सुरू करण्यात तोडपाणी झाल्याचे काहीजण म्हणत आहेत, कुठंतरी पाणी मुरतंय असा आरोपही त्यांनी केला. राज्यात डान्स बार पुन्हा सुरू करू नये, हवे असेल त्रुटी काढून पुन्हा विधिमंडळात नवीन कायदा करावा आम्ही त्याला पाठिंबा देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यात 16 मंत्र्यांनी 90 कोटी खाल्ले 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. राज्यात देवेंद्र फसवणीस यांचे सरकार आहे. राज्यातील 16 मंत्र्यांनी तब्बल 90 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

मोदी, फडणवीस घाबरलेले : जयंत पाटील 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पाच राज्यातील पराभवामुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार घाबरलेले आहे. त्यामुळे ते आता शेवटच्या घटकेला पाहिजे ती आश्‍वासने देत आहेत. यावेळी त्यांनी मोदी यांच्या 2014 भाषणाच्या काही क्‍लीपही ऐकवल्या व त्यांनी कशी फसवणूक केली आहे. हे सांगून या सरकारला खाली खेचावे असे आवाहन केले. 

छावण्याऐवजी डान्सबार, लावण्या : भुजबळ 
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. जनता टॅंकर आणि गुरांसाठी छावण्या मागत आहे. परंतु हे सरकार डान्सबार आणि लावण्या देत आहे. राज्यातील जनतेचे हक्‍काचे पाणी गुजरातला वाहून जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी चित्रा वाघ, फौजिया खान, जयदेव गायकवाड, गुलाबराव देवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com