धुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला

राहुल रनाळकर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

 

धुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला

 

 

धुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला

 

धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय अखंड यासाठी म्हणावा लागेल, कारण या निवडणुकीची सगळी सुत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली होती. धुळ्याच्या प्रभारीपदाची घोषणा होताच, धुळ्याचे भाजपाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध दंड थोपटले. त्यानंतर क्रमाक्रमाने गोटे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि धुळे लोकसभेचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना लक्ष्य करणे सुरु केले. भामरे यांच्यापाठोपाठ गोटे यांनी राज्याचे पर्यटन आणि रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनाही खुले आव्हान दिले. वास्तविक हे आव्हान राजकीय स्वरुपाचे नव्हते. गोटे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या तिन्ही मंत्र्यांविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या. वास्तविक धुळे महापालिकेतील अनिल गोटे यांचे स्थान यापूर्वीही नाममात्र असेच होते. गेल्या महापालिकेत त्यांच्याकडे अवघ्या ३ जागा होत्या. जी संख्या आता एकवर आलेली आहे. खरं पाहता महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती, आणि राष्ट्रवादीला बसलेला फटका हा मोठा आहे. राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत अवघ्या ८ जागा मिळाल्या आहेत. एमआयएमची जळगावपाठोपाठ धुळ्यातही एंट्री झाली. औवेसींच्या या पक्षाने ४ जागा पटकावल्या, तर समाजवादी पक्षानेही २ जागा मिळविल्या. शिवसेनेला अवघ्या एका जागेवर थांबावे लागले. त्यामुळे गोटे विरुद्ध भाजपाच्या भांडणात लाभ उठवू पाहणाऱ्या पक्षांनाही या निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे गोटे आणि भाजपाने मिळून अन्य पक्षांविरुद्ध रचलेली ही खेळी होती का, असेही राजकीय निरीक्षक गंमतीने म्हणू लागले आहेत. 

गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिकमध्ये भाजपाने झेंडा रोवला. त्यापाठोपाठ जामनेरमध्ये २५ पैकी २५ जागा जिंकून भाजपाने चमकदार कामगिरी केली. जळगाव महापालिकेत प्रथमच भाजपाची एकहाती सत्ता आली. आता धुळ्यातील विजयामुळे ही विजयी श्रृंखला अखंड बनली आहे. राष्ट्रवादीची ८ आणि काँग्रेसची ६ जागांपर्यंत झालेली घसरण नक्कीच चिंतेची बाब आहे. भाजपाला एकहाती सत्ता मिळाल्याने त्यांच्यावर जसे अपेक्षांचे ओझे असेल, तसेच विरोधीपक्ष कमकुवत बनल्याने सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधकांसमोरचे आव्हान बनणार आहे. धुळ्यातील जनतेला विकासाची आस आहे. भाजपाला त्यांनी दिलेली साथ त्यासाठीच महत्त्वाची आहे. धुळ्यातून दोन मंत्री सध्या कार्यरत आहेत. केंद्रात सुभाष भामरे तर राज्यात जयकुमार रावल या मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि शहरात विकासाच्या योजना येतील, अशी आशा धुळेकरांना आहे. त्यात महापालिकेची सत्ता भाजपाकडे सोपवून जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याची जबाबदारी आता या नेत्यांवर पर्यायाने भाजपावर आहे. महापालिका, राज्य आणि केंद्र अशी तिहेरी सत्ता असल्याने धुळ्यात विकासाचे पर्व सुरु होईल, अशी भावना धुळे जिल्ह्यात तयार होत आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेचा काळ तसा कमी उरला आहे. तथापि, राहिलेल्या काळात जे-जे शक्य आहे, ते धुळ्याच्या पारड्यात टाकून घेण्याचे कौशल्य या नेत्यांना दाखवावे लागणार आहे. भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा शतप्रतिशत भाजपाचा नारा खरा ठरविण्यात धुळ्याचे योगदान आहे, त्यामुळे धुळ्याच्या पदरी पुढच्या काळात काय-काय येते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: akhand